चिपळूण : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादीवर केलेल्या टीकेचे पडसाद चिपळूणात उमटले आहेत. जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे प्रवीण दरेकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा जाहीर निषेध केला. यावेळी महिलांनी दरेकर यांची प्रतिमा असलेला फोटो फाडला. तसेच तहसीलदारांना निवेदन देत दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली.
भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे. गरीबांकडे बघण्यासाठी राष्ट्रवादीला वेळ नाही. राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले होते. याचाच निषेध म्हणून राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा सक्षणा सलगर यांच्या सूचनेनुसार रत्नागिरी राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे जिल्हाध्यक्षा दिशा दाभोळकर यांच्या नेतृत्वाखाली प्रवीण दरेकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यात आला.
प्रवीण दरेकर यांनी राज्यातील महिलांचा अपमान केला आहे. टीका करताना दरेकर यांची जीभ घसरली आहे. पुरोगामी महाराष्ट्रात नेहमीच महिलांचा आदर केला जात आहे. मात्र, दरेकर यांनी केवळ प्रसिद्धीसाठी महिलांना उद्देशून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. त्यामुळे दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जाहीर माफी मागावी. या नेत्याला पक्षातून हकालपट्टी करून राजीनामा घ्यावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी दिला. तसेच पुरोगामी महाराष्ट्रातील महिलांची बदनामी करणाऱ्या दरेकरांची भाजपमधून हकालपट्टी करावी, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेस जिल्हाध्यक्षा दिशा दाभोळकर, शहराध्यक्ष जान्हवी फोडकर, जिल्हा सचिव प्रणिता घाडगे, कार्यकारिणी सदस्य नमिता विचारे, अंकिता सुतार, युक्ता कदम उपस्थित होत्या.