रत्नागिरी : बारसू परिसरात रस्त्यावर झोपून पोलिसांची वाट आढळणाऱ्या सर्व महिला आंदोलक ग्रामस्थांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना तेथून रत्नागिरीमध्ये आणण्यात आले असून, पोलिस मुख्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात ठेवण्यात आले आहे.आज, मंगळवारी (दि.२५) सकाळपासूनच बारसू परिसरातील ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे. मातीचे सर्वेक्षण करण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाचा कंटेनर सर्वेक्षणस्थळी दाखल झाला आहे. कामात कोणतीही अडचण येऊ नये, ग्रामस्थांनी काम अडवू नये, यासाठी तेथे प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र मंगळवारी सकाळी नियोजित सर्वेक्षणस्थळाकडे जाणाऱ्या पोलिसांच्या अनेक गाड्या ग्रामस्थांनी वाटेतच अडवल्या. त्यात अनेक महिला ग्रामस्थ रस्त्यावर झोपल्या होत्या या सर्व महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.अकरा वाजेपर्यंत पोलिसांची एक मोठी गाडी या महिलांना घेऊन रत्नागिरीत दाखल झाली आहे आणि आणखी तीन ते चार गाड्यांमधून महिला आंदोलकांना रत्नागिरीत आणले जाणार असल्याचे समजते. सध्या या महिलांना पोलिस मुख्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात ठेवण्यात आले आहे
रिफायनरी प्रकल्पाला विरोध: महिला आंदोलक पोलिसांच्या ताब्यात, पहिली गाडी रत्नागिरीत दाखल
By मनोज मुळ्ये | Published: April 25, 2023 11:32 AM