चिपळूण : कामथे उपजिल्हा रुग्णालयातील एका डॉक्टरला डीएनए टेस्टचे सॅम्पल घेण्यास उशीर झाल्याच्या कारणावरून मारहाण करून धमकी देण्यात आली हाेती़ तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची घटना शनिवारी (१ मे) घडली होती. याप्रकरणी येथील पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही महिलांची पोलीस कोठडी गुरुवारी संपल्यावर त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या दोघींनाही रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहात पाठविण्यात आले आहे.
कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. मारोती कुंडलिक यांना अश्विनी भुस्कुटे यांनी आपल्याशी उद्धट वर्तन केले, तर त्यांच्यासोबत असलेल्या राधा लवेकर यांनी मारहाण केली. या दोन्ही महिलांनी आपापसात संगनमताने आपल्यासह डॉ. प्रवीण धंदुरे यांना शिवीगाळ करीत जिवे ठार मारण्याची तसेच विनयभंगाची केस करण्याची धमकी दिल्याची फिर्याद केली हाेती़ त्यानुसार चिपळूण पोलिसांनी दोन्ही महिलांवर गुन्हा दाखल करून दोघींना अटक केली हाेती. या प्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक वर्षा शिंदे करीत आहेत.
सामाजिक कार्य करूच नये का : अशोक भुस्कुटे
कामथे रुग्णालयातील प्रकार गैरसमजुतीने घडला होता. त्याविषयी अश्विनी भुस्कुटे यांनी माफीनामाही दिला होता. वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय सानप यांच्या मध्यस्थीने हे प्रकरण मिटवले गेले होते. मात्र, काहींनी त्यामध्ये खतपाणी घालून हे प्रकरण चिघळले. डीएनए घेताना बाळ सुखरूप राहावे या काळजीपोटी हा प्रकार घडला. त्यावेळी डॉ. कुंडलिक हे कोविड सेंटरमधून आले होते, तेव्हा सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी मास्क व अन्य कोणतीही काळजी घेतली नव्हती. त्यांचे ओळखपत्रही गळ्यात नव्हता. त्यामुळे गैरसमज झाला. तरीही आपल्या पत्नीला नंबर एकचा आरोप केले गेले, मग आम्ही सामाजिक कार्य करायचे की नाही, असा प्रश्न अश्विनी भुस्कुटे यांचे पती अशोक भुस्कुटे यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे़