चिपळूण : आपल्या कर्तव्यामुळे कुटुंबापासून दूर असणाऱ्या पोलीस आणि एसटीचे चालक वाहक याना सह्याद्रीच्या इंग्लिश मीडियम स्कूलच्या महिला कर्मचाऱ्यांनी राखी बांधून त्यांना कौटुंबिक स्नेह मिळवून दिला आहे. माजी सभापती पूजा निकम यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधन येथे साजरे करण्यात आले.
शिक्षणाबरोबर संस्कार आणि संस्कृती जोपासण्याचे काम सह्याद्रीच्या इंग्लिश मीडियम स्कूल करीत आहे. दरवर्षी रक्षाबंधन हा सण येथील महिला कर्मचारी आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करतात. माजी सभापती आणि स्कूलच्या सदस्या पूजा निकम यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम केला जातो. स्कूलच्या मुख्याध्यापिका मीरा जोशी आणि त्याची सर्व टीम दरवर्षी हा कार्यक्रम साजरा करतात. पोलीस आणि एसटीचे चालक, वाहक आपले कर्तव्य बजावताना आपल्या घरापासून दूर असतात. त्यामुळे त्याना अशा कार्यक्रमापासून केवळ आणि केवळ कर्तव्यामुळेच दूर राहावे लागते. अशा भावांना या बहिणींनी राखी बांधून कौटुंबिक स्नेह मिळवून दिला आहे. मुख्याध्यापिका मीरा जोशी यांच्यासह विद्या कुसमडे, रोहिणी नगरकर, यास्मिन शेख, मनीषा पाटील, रूपाली थोरात, सोनाली कदम, मनीषा खोत यांनी चिपळूण पोलीस स्थानक, सावर्डे पोलीस स्थानक व गावागावात दऱ्याखोऱ्यात प्रवासी वाहतूक सेवा देणाऱ्या चिपळूण आगारातील चालक, वाहक यांना राखी बांधण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमाचे नियोजन श्रावणी सावर्डेकर यांनी केले असून, मुक्ता निकम यांनी विशेष सहकार्य केले आहे.