लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनाच्या आजारपणातील नैराश्य झटकून शहरातील सामाजिक न्याय भवन येथील कोरोना सेंटरमधील रूग्ण महिलांनी ‘वडाच्या झाडाइतकं दीर्घायुष्य लाभो तुला, जन्मोजन्मी असाच तुझा सहवास लाभो मला’ अशी आपल्या जोडीदारासाठी सात जन्माच्या साथीची मागणी करत वटपाैर्णिमेचे व्रत पूर्ण केले.
ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस ‘वट पौर्णिमा’ म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वट पौर्णिमेचे व्रत करतात. या व्रतादरम्यान पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. रत्नागिरीतील कुवारबाव येथील सामाजिक न्याय भवनमधील कोविड सेंटरमध्येदेखील गुरूवारी वट पौर्णिमा साजरी केली गेली.
कोरोना सेंटरमधील या कोरोनाग्रस्त महिलांना यावर्षी घरी नसल्याने हे व्रत करता येणार नव्हते. मात्र, त्यांच्या मनातील हा सल ओळखून त्यांच्या हक्काचा वट पौर्णिमा सण साजरा करण्यासाठी नेहमीप्रमाणे हेल्पिंग हॅंडसच्या स्वयंसेवकांनी सहकार्य केले. यासाठी वडाची पाच रोपे तसेच पूजेसाठीचे सर्व साहित्य त्यांना हेल्पिंग हॅंडसच्या या बंधूंनी उपलब्ध करून दिले होते. त्यामुळेच सध्या महत्त्वाचा असलेला व प्राणवायू देणाऱ्या वटवृक्षाचे पूजन करून या महिलांनी पतीच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.
स्वतःला झालेला आजार विसरून आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे, यासाठी या महिलांनी वडाची पूजा केली. या उपक्रमाला गोगटे काॅलेजमधील २००० सालच्या बॅचचे माजी विद्यार्थी गणेश धुरी, समीर भोसले, प्रशांत सागवेकर, संदेश कांबळे, योगिनी सावंत, नीता शिवगण आणि सहकारी विद्यार्थी, हेल्पिंग हँड आणि कोविड केअर सेंटर्समधील सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले. शुक्रवारी याच झाडांचे कोविड सेंटर परिसरात वृक्षारोपण केले जाणार आहे.
प्रशासनाच्या प्रोत्साहनाची थाप कायम
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. संघमित्रा फुले यांचे प्रोत्साहन हेल्पिंग हॅंडसच्या कार्यकर्त्यांना नेहमीच मिळत असते. यावेळीही त्यांच्या प्रोत्साहनाने आणि कोविड सेंटरमधील सर्व आरोग्य यंत्रणेच्या सहकार्याने या महिलांना वटपौर्णिमा सण साजरा करण्याचा आनंद मिळाला.
महिलांना हे व्रत व्यवस्थित करता यावे, यासाठी गणेश धुरी यांनी विशेष मेहनत घेतली. एवढेच नव्हे तर दुपारी आणि रात्रीचे विशेष उपवासाचे जेवण देण्याची व्यवस्थाही त्यांनी केली. वटपोर्णिमेची पूजा झाल्यावर महिलांच्या चेहर्यावरील हास्य आणि समाधान खूप काही देऊन गेले.
या बातमीला तन्मय दातेचे फोटो आहेत.