विहार तेंडुलकररत्नागिरी : नववीत असताना जिवंत साप अगदी लिलया पकडणारी ती आता जंगल संवर्धनासाठी पुढे आलेय. अवघ्या २५ वर्षांच्या वयात तिचं धाडस पाहूनच आपल्या काळजात धडकी भरेल. बिबट्याला पाहून पळून जाणाऱ्यांपैकी ती नाही तर त्याचा फोटो काढण्याची हिंमत बाळगणारी ही सह्याद्रीची सुकन्या !
सह्याद्री वाचवा अशी तिची हाक उत्तर रत्नागिरीतील धनगरवाड्यात घुमतेय. ज्या वयात नोकरीधंद्यासाठी संघर्ष सुरु असतो, त्या वयात तिने जंगल संवर्धनासाठी जनजागृती सुरू केलेय. तिचं नाव सोनल ऊर्फ राणी प्रभूलकर! एवढ्या कमी वयात सह्याद्री संवर्धन व संशोधन संस्था (एससीआरओ) याची सर्वेसर्वा!सोनल (राणी)चं मूळ गाव गुहागर तालुक्यातील रानवी. मात्र, ती लहानपणापासून खेळली, बागडली चिपळूण तालुक्यातील अलोरे गावी! लहानपणापासूनच निसर्ग, पक्षी यामध्ये रमणाऱ्या सोनलला नववीत असल्यापासून जिवंत साप पकडण्याची सवय लागली, त्यात ती तरबेज झाली.
विक्रांत प्रभूलकर, सदफ पडवेकर हे तिचे सहकारीही तिच्यासोबत होतेच. पण, सर्प पकडून तो सोडण्यासाठी जंगलं तर हवीत, हा विचार तिच्या मनात चमकला आणि त्यानंतर तिने जंगल संवर्धन या विषयाला वाहून घेतले. त्यावेळी ती महाविद्यालयात होती.
सन २००७पासून तिच्याकडील पॉकेटमनी हा जंगल संवर्धनावरील जनजागृतीसाठीच खर्ची पडू लागला. केवळ जंगल संवर्धन या विषयावर जनजागृती करणे एवढंच ती करत नव्हती तर त्याबरोबर तिचा अभ्यासही सुरु होता. तिने चिपळूणच्या डीबीजे महाविद्यालयातून प्राणीशास्त्र विषयातून एम. ए. केले आहे.जंगलांचे संवर्धन करायचे असेल तर धनगर समाजामध्ये याविषयी जनजागृती केली पाहिजे. कारण जंगलाजवळच धनगरवाड्या वसलेल्या दिसतात. या लोकांमध्ये जागृती करण्यासाठी शिक्षण घेत असतानाच तिने आपला मुक्काम या धनगरवाड्यांवरच हलवला.
कुंभार्ली घाटातील कासारबुद्रुक धनगरवाडा आणि कोयनानजीक असलेल्या भाटा धनगरवाडा येथे तिने दोन वर्षे काढली. तेथील लोकांसमवेत राहून तिने जंगल संवर्धनाबाबत जनजागृती सुरु केली. त्यामुळे आज येथील लोकांना निसर्गाचे महत्त्व पटले आहे. सध्या सह्याद्री संवर्धन व संशोधन संस्थेचे कार्यक्षेत्र हे उत्तर रत्नागिरीच राहिले आहे. त्याचा विस्तार करून जंगल संवर्धनाच्या दृष्टीने संस्था प्रयत्न करणार असल्याचे सोनल सांगते.छोटी नेचर गाईडधगनरवाड्यांतील मुलं-मुली केवळ शिकून चालणार नाहीत तर त्यांना निसर्गाची माहिती झाली पाहिजे आणि तीही लहान वयात. यासाठी सोनलने प्रयत्न सुरु केले आहेत. या वाड्यांमध्ये नेचर गाईड नेमण्याचे काम सुरु केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कासारखडक धनगरवाड्यातील पाचवीत शिकणाऱ्या जनाबाई शेळके हिचे सध्या हे प्रशिक्षण सुरु असून, लवकरच एवढ्या छोट्या वयात ती नेचर गाईड म्हणून काम सुरु करेल.धगनरवाड्यांत झपाट्याने झालेला बदलधनगरवाड्यांची व बिबट्यांची चांगली मैत्री आहे, असे सोनल सांगते. बिबटे आहेत म्हणूनच धनगरवाड्यात चोर येत नाहीत, असे येथील लोकांचे म्हणणे आहे. या वाड्यांमध्ये सोनलने संस्थेच्या माध्यमातून जनजागृती राबवली आणि आज चित्र आणखीनच बदलले आहे.
आज रात्री कधीही बिबट्या धनगरवाडीत प्रवेश करतो. कोंबड्यांवर यथेच्छ ताव मारतो आणि निघून जातो. सह्याद्री संवर्धन व संशोधन संस्था (एससीआरओ) संस्थेने केलेल्या जनजागृतीमुळे धनगरवाड्यातील लोकांनी बिबट्याचा कोंबड्यांवर होणारा हा हल्ला जणू मान्य केला आहे.विद्यापीठाच्या अभ्यास समितीवर निवडसोनल लहानपणापासूनच हुशार असल्याने एस. वाय. बीएस्सी.ला असताना तिची मुंबई विद्यापीठाच्या अभ्यास समितीवर निवड झाली होती. त्यावर्षी महाराष्ट्रातून चार मुलींची निवड झाली, त्यात सोनलचा समावेश होता.एकटीने जंगल सफरभाऊ विक्रांत आणि सहकारी सदफ पडवेकर यांच्याबरोबर जंगल सफर करणाऱ्या सोनलने एकदा तर एकटीनेच ही सफर केली आहे. यावेळी गवारेडा, बिबट्याचेही तिला दर्शन झाले आहे. मात्र, तीही जणू एखाद्या सराईताप्रमाणेच जंगलात वावरत असते.डिसेंबरमध्ये संस्थेची नोंदणीसह्याद्री संवर्धन व संशोधन संस्थेची (एससीआरओ) नोंदणी डिसेंबर २०१७मध्ये झाली. मात्र, सोनलचे काम त्या अगोदरपासूनच सुरु होते. सोनल ही या संस्थेची संस्थापक अध्यक्ष आहे.