अरुण आडिवरेकर
रत्नागिरी : लहानपणी फटाके वाजवायलाही घाबरणारी मुलगी फायरिंगमध्ये अव्वल येईल, असे सांगितल्यास कोणालाही खरे वाटणार नाही. पण, एनसीसीमध्ये सहभागी होऊन केवळ फायरिंगमध्ये अव्वल न राहता लेफ्टनंट कॅप्टन पदावर पोहोचण्याची किमया सीमा शशिकांत कदम यांनी साधली आहे.सीमा कदम यांचे लांजा तालुक्यातील आसगे येथे घर आहे. प्राथमिक शिक्षण लांजात येथे झालेले. वडील अनंत कांबळे हे त्याकाळी प्रगतशील शेतकरी म्हणून नावारूपाला आलेले, तर आई प्राथमिक शिक्षिका.
सामान्य कुटुंब असूनही चांगल्या संस्कारांची शिदोरी त्यांना आई-वडिलांकडून मिळाले. बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी कोल्हापूरला जाणे ठरले. त्याकाळी मुलीने घरापासून इतक्या लांब राहणे इतरांना न पटणारेच होते. तरीही वडिलांनी दाखविलेल्या विश्वासावर त्या कोल्हापूरला आल्या.वाणिज्य शाखेत शिकत असताना एनसीसीच्या कॅप्टन रूपा शहा यांनी एनसीसीत सामील होण्याची संधी दिली. ही संधीच त्यांच्यासाठी टर्निंग पॉर्इंट ठरली. लहानपणी फटाक्यांना घाबरणाऱ्या सीमा कदम फायरिंगमध्ये मात्र अव्वल ठरल्या.
लक्ष्यावर अचूक नेम साधण्याची किमया करत त्यांनी अजूनही आपले स्थान भक्कम केले आहे. १९९६ला गोगटे - जोगळेकर महाविद्यालयात हजर होताना एनसीसीतील सी - सर्टीफिकेटमुळे आणखी एक संधी मिळाली.गोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करताना एनसीसी अधिकारी म्हणून त्यांच्या नावाचा प्रस्ताव पाठविण्यात आला. त्याला मंजुरी मिळताच नेव्हलमध्ये त्या अधिकारी म्हणून रूजू झाल्या. मात्र, महिलांसाठी नेव्हलचे प्रशिक्षण केंद्र नसल्याने त्यांना आर्मीचा पोशाख परिधान करून प्रशिक्षण घ्यावे लागले.
यशाचा एक एक टप्पा पार करताना त्यांची लेफ्टनंट कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली. नेव्हल आणि आर्मी या दोन्ही ठिकाणी काम करणाऱ्या त्या एकमेव महिला अधिकारी बनल्या.करिअर, संसार त्यातून होणारा विकास याला अधोरेखित करून त्यांनी आपले ध्येय गाठण्याचे निश्चित केले. अडीच वर्षाच्या मुलीला घरी ठेवून ग्वाल्हेर येथे पहिल्या प्रशिक्षणाला जावे लागणाऱ्या सीमा कदम यांना त्यांच्या पतीचीही तितकीच साथ मिळाली.
मुलांपासून दूर राहात असताना मनाचा कणखरपणा त्यांना पुढे जाण्याचे पाठबळ देत होते. लेफ्टनंट कॅप्टन म्हणून काम करताना रत्नागिरीत डिफेन्स सेंटर सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. हे सेंटर सुरू करून एकतरी सैनिक या मातीतून घडावा, हे त्यांचे स्वप्न आहे.पुरस्कारांनी सन्मानभावी पिढी घडविण्याचे समाधान मिळत असल्याचे त्या आवर्जून सांगतात. स्त्रीने मन खंबीर केले, चिकाटी, सहनशीलता, आत्मविश्वास असेल तर चांगले करिअर घडविता येते, असेही त्या सांगतात. सीमा कदम या करत असलेल्या कामाबद्दल आम्ही उद्योजिका सांगलीतर्फे संजीवनी पुरस्कार, सॅफरॉनतर्फे नवदुर्गा पुरस्कार, दलित साहित्य अॅकॅडमीतर्फे वीरांगणा सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
घराच्या बाहेर राहिल्याशिवाय आत्मविश्वास येणार नाही, हा वडिलांचा विश्वास होता. आई-वडिलांनी टाकलेला विश्वास कधीच तोडू नये. अजूनही बरचं काही कमावयचं आहे. अंगावरील पोशाख संरक्षण, मान आणि सन्मान देतो, त्याचबरोबर जबाबदारीही शिकवतो. समाजात वावरताना चांगलं अंतर ठेवून काम करा. कोणतही काम रडत करण्यापेक्षा आनंदाने ते करा.- सीमा कदम