लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालके अधिक बाधित होतील, असा धोका जागतिक आरोग्य क्षेत्रातून व्यक्त होत आहे. त्या अनुषंगाने या तिसऱ्या लाटेपासून बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. बालके बाधित झाल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार होण्यासाठी जिल्हा महिला रुग्णालयाच्या दुसऱ्या बाजूकडील इमारतीत ऑक्सिजन बेड कक्ष, अतिदक्षता कक्ष आदींसह १०० खाटांचे सुसज्ज बाल कोविड रुग्णालय तयार करण्यात आले आहे. या रुग्णालयात दाखल होणाऱ्या बालकांना आपण घरातच आहोत, असे वाटावे, यादृष्टीने कार्टून्स आणि त्यांच्या आवडत्या व्यक्तीरेखा रेखाटण्यात आल्या आहेत.
तिसऱ्या लाटेचा धोका बालकांना असल्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग अधिक खबरदारी घेत आहे. तिसऱ्या लाटेची झळ बालकांना पोहोचू नये, यासाठी अनेक उपाययोजना युद्धपातळीवर करण्यात येत आहेत. बालके बाधित झाल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार होण्यासाठी महिला रुग्णालयाच्या दुसऱ्या इमारतीत स्वतंत्र बाल कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. सोमवारी त्याचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री डाॅ. राजेश टोपे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
बाधित झालेल्या बालकांना या रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना रुग्णालयात आल्याचे दडपण न वाटता आपण आपल्या घरीच राहून उपचार घेत आहोत, असे वाटावे, यासाठी विविध खेळण्यांची सुविधा या रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. या बाल रुग्णालयात १२ ऑक्सिजन बेडचा कक्ष सुसज्ज ठेवण्यात आला आहे. यात बाल रुग्णांचे मन रमविण्यासाठी विविध कार्टून्स, जंगली प्राणी, फुलपाखरू, तसेच त्यांच्या आवडत्या व्यक्तिरेखा डोरेमाॅन, मिकी, मि.बीन, टाॅम ॲण्ड जेरी, डोनाल्ड, हम्टी-डम्टी, पांडा, बॅटमन यांच्यासह कार्टून्स रेखाटण्यात आली आहेत. त्यामुळे येथे उपचार घेणाऱ्या बालकांना हे पाहून आनंद वाटेल, आणि त्यांच्यात मानसिक सकारात्मक बळ आल्याने उपचाराला चांगला प्रतिसाद देतील, या उद्देशाने रुग्णालयाच्या भिंती अशाप्रकारे सुशोभित करण्यात आल्या आहेत.
---------------------
जिल्हा शल्य चिकित्सकांची संकल्पना
जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. संघमित्रा फुले यांच्या संकल्पनेतून बाल रुग्णालयातील हा विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. त्यांनी ही कल्पना हेल्पिंग हॅंडसचे सदस्य सचिन शिंदे यांना सांगितली. त्यांनी लागलीच त्यांच्यासमवेत राजरत्न प्रतिष्ठान आणि आता हेल्पिंग हॅंडसला सहकार्य करणाऱ्या ऐश्वर्या गावकर आणि नेहा साळवी यांना सांगितले. या दोघींनी सलग पाच दिवसांत सायंकाळी ५ वाजल्यापासून रात्री दोन-अडीच वाजेपर्यंत जागून ही सर्व चित्रे रेखाटली आहेत.
--------------------------
आम्ही दोघीही केटरिंगची कामे करतो. मात्र अशी चित्रे काढण्याचा कोणताच अनुभव नव्हता. परंतु, चित्र काढण्याची आवड होती. त्यातच लवकरात लवकर ही चित्रे रंगवायची होती. आम्ही ही चित्रे काढू शकू ना, ही शंकाही वाटत होती. मात्र, जिद्दीने पुढे आलो. दिवसा आमची कामे करून सायंकाळी चार किंवा ५ वाजल्यानंतर रुग्णालयात येऊन रात्री अगदी दोन अडीच वाजेपर्यंत सलग ही चित्रे काढत होतो. त्यामुळे ही चित्रे पाच दिवसांत पूर्ण झाली.
- ऐश्वर्या गावकर, नेहा साळवी