रत्नागिरी : रत्नागिरी पालिकेत सेना-भाजपने युतीने निवडणूक लढवून अडीच वर्षांपूर्वी सत्ता काबीज केली. मात्र, विधानसभा निवडणुकीत राज्यातील सेना-भाजप युती तुटल्यानंतर रत्नागिरी पालिकेतही तीच स्थिती असल्याचे स्पष्ट झाले. उपनगराध्यक्ष निवडणुकीत त्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे या दोन्ही पक्षात सातत्याने संघर्ष निर्माण होत असून, शहरातील अनेक विकासकामांची कोंडी झाली आहे. दोघांच्या भांडणात विकासाचे तीनतेरा वाजले असून, नागरिकांतून याबाबत नाराजी व्यक्त होत आहे. रत्नागिरी पालिकेत युतीची सत्ता आल्यानंतर प्रत्येकी सव्वा वर्षासाठी दोनवेळा नगराध्यक्षपद घेण्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी घेतला होता. मात्र, युती तुटल्यानंतर पालिकेतील भाजप नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी पद सोडण्यास नकार दिल्यानंतर सेना - भाजपात वादावादी सुरू झाली. एकमेकांना घेरण्याचा प्रयत्न सुरू झाला. पालिकेच्या सभेत भाजप नगराध्यक्ष मयेकर यांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. शिवसेनेला महत्त्व न देता कारभार करण्याचा प्रयत्न भाजपानेही केला. त्यातूनच संघर्ष वाढला असून, गेल्याच आठवड्यात झालेल्या विशेष सभेत अनेक विषयांवर मंजुरी देताना शिवसेनेने आपली ताकद दाखवून दिली. शहरातील एलइडी प्रकल्प राबविण्यासाठी नगराध्यक्ष मयेकर यांनी संबंधित कंपन्यांकडून थिबा रोडवर एलइडी पथदीपांचा पायलट प्रोजेक्टही राबवून घेतला. त्यावेळी सेना-भाजपा एकत्र होते. आता युती तुटली असून, भाजपाने शब्द पाळला नाही, याचा राग सेनेला आहे. त्यामुळे एलइडी प्रोजेक्टसाठी निविदा मागवा नाहीतर हा प्रस्ताव तहकुब ठेवा अशी मागणी करीत हा विषय रोखला आहे. त्यामुळे कोंडी करण्याचे सत्र यापुढेही सेनेकडून होणार आहे. (प्रतिनिधी)सेनेच्या या भूमिकेमुळे भाजपानेही शह-काटशहाचे राजकारण सुरू केले आहे. राष्ट्रवादीच्या खांद्यावर बंदूक ठेवत राष्ट्रवादीतून फुटून वेगळा गट केलेल्या चार नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी भाजपानेच पुढाकार घेतल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे हे शह-काटशहचे राजकारण यापुढेही रंगणार आहे. त्यातच दोन्ही पक्षांची शक्ती खर्च होणार आहे.
सेना-भाजपच्या भांडणात कामांना ब्रेक
By admin | Published: November 23, 2014 10:06 PM