चिपळूण : गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या शहरातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहुचर्चित उड्डाणपुलास सुरुवात झाली असून आता या कामाने चांगलाच वेग घेतला आहे. बहादूरशेखनाका येथून पुलाचे खांब उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हा उड्डाणपूल १८३५ मीटर लांबीचा असेल. तर एकूण ४५ खांबांवर हा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. वाशिष्ठी नदीवरील नवीन पुलाच्या कामाने गती घेतलेली असतानाच या उड्डाणपुलाचे कामही सुरू झाल्याने चिपळूणकरांंमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणात शहरातून उड्डाणपुलाची उभारणी केली जाणार आहे. वाशिष्ठी नदीजवळ सुरू होणारा हा उड्डाणपूल युनायटेड हायस्कूलजवळ संपणार आहे. सध्या पुलाच्या कामासाठी बहादूरशेखनाका येथे खोदाईस सुरुवात झाली आहे. पुलाच्या पूर्वतयारीसाठी जमिनीत बोअरवेल मारून मातीच्या थराची तपासणी करण्यात आली होती. तब्बल दोन ते तीन वेळा हे रॉक टेस्टिंग करण्यात आले होते. आता या पुलाच्या कामास खरी सुरुवात झाली आहे. पुलाच्या कामास सुरुवात झाल्याने सर्व्हिस रोडच्या कामाने वेग घेतला आहे. बहादूरशेखनाका ते शहरात सर्व्हिस रोड असणार आहे. त्याचे काम गतीने सुरू आहे.
शहरात काही जमिनी व इमारतींना मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे त्यांच्या इमारती व जागा संपादित केलेल्या नाहीत. त्या ठिकाणी गटाराचे काम काही फूट आतमध्ये घेण्यात आले आहे. सर्व्हिस रोडची कामे ही काही ठिकाणी मार्गी लागली आहेत. तर उर्वरित ठिकाणी ती मार्गी लावली जात आहेत. उड्डाणपूल हा पॉवर हाउसपर्यंत नेण्याची मागणी करण्यात आली होती. त्यासाठी पालिकेने ठराव केला. नागरिकांनी आंदोलनेही केली. मात्र त्याचा काहीच फरक पडलेला नाही. उड्डाणपुलाच्या कामात बदल झालेला नसून मूळ नियोजित ठिकाणीच हा पूल साकारला जाणार आहे. पुलाचे काम सुरू असताना वाहतूक व्यवस्थेत बदल केला जात आहे. पुलाच्या कामास २ वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यादृष्टीने पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त काम मार्गी लागावे, यासाठी ठेकेदार कंपनीचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
..........................
पाेलीस चाैकी बाधित
बहादूरशेख येथील पोलीस चौकी महामार्गात बाधित झाली. चौकीचे बांधकाम तोडून तेथे रस्ता तयार करण्यात आला आहे. बहादूरशेखनाका येथेच एक कंटेनर पोलिसांसाठी ठेवण्यात आला. तेथून पोलिसांचे काम सुरू आहे.