गुहागर : तालुक्यातील मोडका आगर येथील पुलाचे काम गेले काही महिने संथगतीने सुरू आहे. पुलाचे काम पूर्ण झाले असले तरी पुलाला जोडणाऱ्या संरक्षक भिंतीचे काम संथगतीने सुरू असल्याने मेअखेर प्रत्यक्ष पुलावरून वाहतूक सुरू होईल की नाही, अशी संभ्रमावस्था वाहनचालकांमध्ये निर्माण झाली आहे.
दोन वर्षापूर्वी मोडकाआगर पूल हा वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे ठरवत बांधकाम विभागाने हा पूल बंद केला होता. काही महिन्यानंतर वाहन चालकांकडून पुलासमोर टाकलेला भराव जेसीबीच्या साहाय्याने बाजूला करत वाहतूक सुरू करण्यात आली. सर्वांनाच होणारा त्रास लक्षात घेऊन प्रशासनानेही याकडे दुर्लक्ष केले होते. गुहागर-विसापूर रस्त्यांतर्गत मोडका आगर पूल ते मार्गताम्हाणेपर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू झाले. यादरम्यान पूल पुन्हा बंद झाल्याने मागीलवर्षी पहिल्यांदा वरवेलीमार्गे धरणाशेजारी रस्त्यावरून व त्यानंतर वरवेली येथील जंगल भागातून तात्पुरत्या रस्त्याचा जवळचा मार्ग वाहनचालकांनी अवलंबला होता, तर एसटी तसेच मालवाहतूक गाड्या तब्बल १२ किलोमीटर अधिकचा प्रवास (पवारसाखरी रानवीमार्गे गुहागर) असा करत होते.
काही महिन्यांपूर्वी पुलाच्या बाजूला मातीचा भराव टाकून अखेर रस्ता चालू करण्यात आला. यापूर्वी पादचाऱ्यांसाठी जाण्यास हा पूल धोकादायक असताना दैनंदिन वाहनांबरोबरच रस्त्याच्या कामाची मालवाहतूक अवजड वाहनेही जाऊ लागली. सद्यस्थितीत पुलाचे काम पूर्ण झाले आहे. या पुलाला दोन्ही बाजूने जोडणाऱ्या चार संरक्षक भिंतीचे काम सुरू केले आहे. यावेळी जूनच्या पहिल्या आठवड्यातच पाऊस सुरू होईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. अशा स्थितीत मेअखेरपर्यंत या भिंतींचे काम पूर्ण होऊन यामध्ये भराव टाकण्याचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. सध्या हे काम खूपच संथगतीने सुरू आहे. वेळेत काम पूर्ण न झाल्यास पावसाळ्यामध्ये पाणी पातळी वाढून हा तात्पुरता रस्ता धोकादायक होऊन वाहतूक बंद करावी लागेल.
मोडका आगर पुलाला जोडणाऱ्या संरक्षक भिंतीचे काम संथगतीने सुरू आहे. (छाया : संकेत गाेयथळे)