रत्नागिरी : कोकणातील बंदरांच्या विकासासाठी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद करण्यात आली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील बंदरांसाठी ३१२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये रत्नागिरीतील मिरकरवाडा टप्पा - २चा समावेश आहे, तर सिंधुदुर्गातील आनंदवाडी येथे मासेमारी बंदर उभारण्यात येणार असून, रायगड जिल्ह्यातील करंजा येथे मासे उतरविण्यासाठी बंदर बांधण्यात येणार आहे.विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात सोमवारी मध्यवर्ती सभागृहात राज्यपाल विद्यासागर राव यांच्या अभिभाषणाने झाली. या भाषणामध्ये त्यावेळी त्यांनी रत्नागिरीतील मिरकरवाडा टप्पा - २च्या कामाबाबत माहिती दिली. मिरकरवाडा बंदर टप्पा २च्या कामाला प्रारंभ होऊन प्राथमिक टप्प्यात ब्रेकवॉटर वॉल उभारणे व टेट्रापॉड टाकणे अशा कामांचा प्रारंभ झालेला आहे. त्यामध्ये जुन्या ब्रेकवॉटरवॉलची नव्याने १५९ मीटर लांबी वाढवण्यात आली आहे.
हे काम पूर्णत्त्वाच्या मार्गावर असून, अजून काँक्रिटीकरणाचे काम बाकी आहे, तर बंदराला नव्याने आणखी ६७५ मीटरची ब्रेक वॉटरवॉल उभारण्यात येत आहे. या वॉलचे ५२५ मीटरचे काम पूर्णत्त्वाकडे गेलेले आहे. टप्पा २च्या कामासाठी एकूण ७३ कोटी ५६ लाखांचा निधी मंजूर आहे. त्यापैकी आतापर्यंत केवळ दोन ब्रेकवॉटरच्या होत असलेल्या कामांवरच ५२ कोटी रुपयांचा निधी खर्ची पडल्याचे सांगितले जात आहे.केंद्र आणि राज्य शासनाचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत मच्छिमारांना आवश्यक असणाऱ्या बाबींचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. मिरकरवाडा टप्पा-२चे काम हाती घेण्यात आले असले तरी या कामासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे हे काम थांबले आहे. यासंदर्भात दिल्ली येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत यावर चर्चाही करण्यात आली होती. या चर्चेमध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, शासनाने ३५ कोटी देण्याचे मान्य केले आहेत.दिल्लीतील बैठकीनंतर राज्यपाल विद्यासागर राव यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरातील टप्पा २चे काम सुरू असल्याचे सांगितले. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आनंदवाडी (ता. देवगड) येथे आणखी दुसरे ८८ कोटी रुपये खर्चाचे मोठे मासेमारी बंदर उभारण्यात येणार आहे.
करंजा (जि. रायगड) येथे १५० कोटी रुपये खर्चाचा मासळी उतरविण्याचा मोठा बंदर प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. असल्याचेही राज्यपाल यांनी यावेळी बोलतानासांगितले.मिरकरवाडा टप्पा २चे काम हाती घेतलेले असतानाच ज्या जागेत झोपड्या उभारण्यात आल्या आहेत. त्या अद्याप तेथेच आहेत. या झोपड्या हटविल्यानंतर पुन्हा तेथे उभारण्यात आल्या. काही झोपड्यांचे पक्के बांधकाम करण्यात आल्याने या झोपड्या हटविण्यात अडथळे येत आहेत.बंदराच्या टप्पा २मधील जेटीची कामे, पथदीप, रस्ते दुरूस्ती, शीतगृह, स्टोअरेज, शौचालये आदी सर्व सोयी-सुविधा उभारणीची मोठी कामे बाकी आहेत. या बंदारात जेटींची पुनर्बांधणी, १६मीटरचे ३०० ट्रॉलर्स आणि १७ मीटरचे २०० पर्ससीन-तथा-ट्रॉलर्स अशा एकूण ५०० नौकांसाठी मासे उतरविण्याच्या जागा, आऊटफिटिंग, नौका दुरूस्ती, नौका पार्किंग आणि इतर पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे नियोजित केले आहे.मिरकरवाडा बंदर टप्पा २ पूर्ण झाल्यानंतर देशातील प्रथम क्रमांकाचे अद्ययावत बंदर उदयास येईल, असे सांगितले जात आहे. त्या कामांना अजूनही प्रारंभ झालेला नाही. दोन ब्रेक वॉटरवॉलवरच आतापर्यंत ५२कोटीचा निधी खर्ची पडला आहे.