लांजा : कामाची कमी अंदाजपत्रक रकमेची निविदा भरणाऱ्या ठेकेदाराला कामाचा ठेका न देता मर्जीतीलच एका ठेकेदाराला कामाचा ठेका देऊन ग्रामपंचायतीचे नुकसान करू पाहणाऱ्या ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस लांजा तालुका मागासवर्गीय सेलचे माजी अध्यक्ष दाजी गडहिरे यांनी जिल्हा परिषदेकडे केली आहे.
लांजा तालुक्यातील बेनी बुद्रुक ग्रामपंचायतीने ई-निविदा प्रक्रिया राबविली. बेनी बु. येथे स्मशानशेड बांधणे व सुशोभीकरण करणे यासाठी निधी वापरला जाणारा आहे. या निविदेमध्ये सहा ठेकेदारांनी सहभाग घेतला होता. सर्व ठेकेदार पात्र असून नियमाप्रमाणे कमी दराची निविदा निवडणे गरजेचे होते. मात्र त्याला बगल देत वाढीव रकमेची निविदा असलेल्या ठेकेदाराला हा ठेका देण्यात आल्याचा आरोप गडहिरे यांनी केला आहे. मर्जीतील ठेकेदाराला ठेका देऊन ग्रामपंचायतीचे ८,३२५ रुपयांचे नुकसान करण्यात आले आहे. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने निविदा प्रक्रिया राबविणाऱ्या ग्रामसेवक व सरपंचावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे लांजा तालुका सामाजिक न्याय सेलचे माजी अध्यक्ष दाजी गडहिरे यांनी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एन. बी. घाणेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.