गुहागर : गुहागर शहरातील घरटवाडी येथे वीज मंडळातर्फे होणाऱ्या ३३ के. व्ही. उपकेंद्रासाठी ३ कोटी ३० लाख ७ हजार एवढा निधी मंजूर आहे. पुणे येथील प्रतिभा इलेक्ट्रिकल कंपनीने सुरू केलेले हे काम गेले वर्षभर बंद आहे. या कामाची मुदत संपल्याने आता नव्या निविदेनंतरच हे काम पुन्हा सुरू होणार असल्याने उपकेंद्राचे काम रखडणार आहे. आमदार भास्कर जाधव हे नगरविकास राज्यमंत्री व पालकमंत्री असताना गुहागर शहरामध्ये पुढील काळातील विजेची वाढती मागणी लक्षात घेत ३३ के. व्ही.चे नवे उपकेंद्र खालचापाट (घरटवाडी) येथील शासकीय जागेत मंजूर झाले. या उपकेंद्र कामाचा शुभारंभ तब्बल दोन वर्षापूर्वी भास्कर जाधव यांच्या हस्ते झाला होता. या कामाची निविदा पुणे येथील प्रतिभा इलेक्ट्रीकल कंपनीला मिळून कामही सुरू करण्यात आले होते. यामध्ये मुख्य इमारतीसाठी लागणारा आरसीसी पाया व त्यावर तात्पुरती लहान इमारत बांधण्यात आली. मात्र, सध्या काम बंद असल्याने ही इमारत आता ढासळू लागली आहे. या जागेतून वहाळ व पारंपरिक रस्ता आहे. हा रस्ता उपकेंद्राच्या शासकीय जागेतून येत असल्याने तो शेती भागातून वळविण्यात येणार आहे. मात्र, सध्या उपकेंद्राचे काम थांबल्याने याबाबत सध्या ‘जेसे थे’ स्थिती आहे. कंत्राटदाराने हे काम नक्की का थांबवले आहे, याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात असून, याविषयी विविध चर्चा सुरू आहेत. (प्रतिनिधी)यादव : पत्रव्यवहाराला उत्तर नाहीकार्यालयाकडून वारंवार कंत्राटदार व संबंधित विभागांना काम सुरू करण्याबाबत तसेच हे काम का थांबवले याबाबत पत्रव्यवहार करुनही कोणतेच उत्तर अद्याप मिळालेले नाही. या कामाचे टेंडर भरल्यानंतरची काम करण्याची मुदत संपल्याने नवीन टेंडर नंतरच आता हे काम सुरू होईल. - पी. डी. यादव उपअभियंता, महावितरण, गुहागर
घरटवाडी उपकेंद्राचे काम अर्धवट!
By admin | Published: April 27, 2016 9:45 PM