चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील वाशिष्ठी पुलाचे काम अचानक बंद करण्यात आले असून, येथील मशनरी साहित्यासह कामगारांनी परतीचा मार्ग पकडला आहे. त्यामुळे पुलाचे काम बंद असून, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडेही कोणतीच माहिती उपलब्ध नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. तूर्तास या पुलाचे काम अर्ध्यावरच लटकण्याची शक्यता आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील वाशिष्ठी नदीवर बहादूरशेख येथे नवीन पुलाचे बांधकाम चार वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते. प्रत्यक्षात हे दोन पूल असून, एका पुलाचे काम गणपतीपूर्वी पूर्ण करून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. येथील जुना पूल जीर्ण व धोकादायक बनल्याने सर्व वाहतूक नवीन पुलावरून सुरू करण्यात आली. त्यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळाला होता. एक पूल पूर्ण झाल्याने बाजूलाच असलेल्या दुसऱ्या पुलाचे काम वेगात पूर्ण होईल व हा पूलही दिवाळीनंतर किंवा डिसेंबरअखेरीस वाहतुकीसाठी खुला होऊन दुहेरी वाहतूक सुरू केली जाईल, असे आश्वासन खासदार विनायक राऊत यांनी दिले होते. परंतु, आता मात्र या पुलाचे भवितव्य अधांतरी लटकतेय की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.
गेल्या महिनाभरापासून कामाची गती मंदावली होती. परंतु, आता मात्र काम पूर्णपणे बंद पडले आहे. इतकेच नव्हे, तर येथील सर्व साहित्य व मोठमोठ्या मशनरीही हलवण्यात येत आहेत. कामगारांनीही गाशा गुंडाळल्याने काम बंद पडले आहे. याबाबत कंपनी व कामगार कोणतीच प्रतिक्रिया देण्यास तयार नाही. याविषयी माजी सभापती शौकत मुकादम यांनी दखल घेत कामाच्या ठिकाणी जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु येथे कोणतीच माहिती त्यांना मिळाली नाही.
पुलाचे काम अचानक बंद का झाले व पुन्हा कधी सुरू करणार? याबाबत संबंधित विभागाने स्पष्ट उत्तर दिले पाहिजे. सर्व माहिती त्यांनी द्यावी. अन्यथा, मग आमच्या भाषेत बोलावे लागेल. काम अर्धवट बंद पडल्याने अडचण निर्माण झाली आहे. वाहतुकीला अडथळे हाेणार असून, अपघाताची संख्या वाढणार आहे. तेव्हा या विभागाने माहिती न लपवता खरं काय ते सांगावे. - शौकत मुकादम, माजी सभापती, पंचायत समिती चिपळूण.