राजापूर : काँग्रेसचे प्रभाग ३ मधील नगरसेवक सुभाष उर्फ बंड्या बाकाळाकर यांनी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांच्या सहकार्यातून प्रियदर्शनी वसाहत क्रमांक १ येथे दोन लाख लीटर क्षमतेची पाण्याची नवीन टाकी बांधली आहे. या टाकीचे कामही पूर्ण झाले असून, येत्या काही दिवसांमध्ये तेथून पाणीपुरवठा सुरू होणार आहे. या पाण्याच्या टाकीमुळे या भागातील लोकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होण्यासह सुरळीत पाणीपुरवठ्याचा भेडसावणारा प्रश्न आता निकाली निघाला आहे.
उंच-सखल भौगोलिक रचनेमुळे शहरातील विविध भागातील लोकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची समस्या वारंवार भेडसावते. प्रभाग ३मध्येही अशीच समस्या होती. कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी नगरसेवक बाकाळकर यांनी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नातून या भागामध्ये पाण्याची नवीन साठवण टाकी बांधण्यासाठी शासनाच्या २०१८ - १९च्या वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून ३५ लाख २० हजार ९१५ रुपये मंजूर झाले. त्यातून प्रियदर्शनी वसाहत क्रमांक १ येथे २ लाख लीटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे.
या साठवण टाकीचे काम पूर्ण झाले असून, काही दिवसातच त्यातून बंगलवाडी, गुरववाडी, पुनर्वसन वसाहत, रॉयल प्लाझा, तालिमखाना परिसर आदी भागातील लोकांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. नवी टाकी बांधताना पाणी वितरण व्यवस्थेमध्येही सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे पाणी वितरणामध्येही सुरळीतपणा येणार आहे.
................
फोटो आहे.
राजापूरच्या प्रभाग ३ मध्ये बांधण्यात आलेल्या पाण्याच्या साठवण टाकीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. नगरसेवक सुभाष बाकाळकर यांनी त्याची पाहणी केली.