टेंभ्ये : राजापूर तालुक्यातील माध्यमिक शाळेतील हरित सेना शिक्षकांना वन खात्याने विचित्र काम लावले आहे. तालुक्यातील सर्व हरित सेना शिक्षकांना झाडांची गणना करण्याचे काम देण्यात आले आहे. यामुळे संबंधित शिक्षकवर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे. जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाने या कामाला तीव्र विरोध केला आहे.जनगणना व निवडणूक कामाव्यतिरिक्त अन्य कोणतेही काम शिक्षकांना लावता येणार नाही, असा शासन निर्णय असतानादेखील वन विभागाने शिक्षकांना हे विचित्र काम लावल्याने शिक्षण क्षेत्रातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गुरुवार, ११ रोजी यासंदर्भातील बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये संबंधित माहिती जमा करण्यास सांगितल्याचे समजते. झाडांची गणना करण्यासाठी विद्यार्थ्यांची मदत घेण्याची सूचना दिल्याचे समजते. झाडे मोजण्याचे काम शिक्षकांचे नाही. याबाबत माध्यमिक अध्यापक संघ आवाज उठविणार असल्याचे संघाचे सचिव अशोक आलमान यांनी सांगितले.एकंदरीत शिक्षकांना झाडे गणना करण्याचे काम प्रथमच लावले आहे. याबाबत मोठ्या प्रमाणात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यापूर्वी कधीही अशा प्रकारे झाडांची गणना करण्याचे काम शिक्षकांना लावण्यात आले नव्हते. या अनोख्या कामामुळे सर्वत्र चर्चेला ऊत आला आहे. (वार्ताहर)शासन निर्णयाच्या विरोधात वनविभाग!शिक्षकांना निवडणूक व जनगणना याव्यतिरिक्त शाळाबाह्य कोणतेही काम लावू नये, या शासन निर्णयाच्या विरोधात वनविभाग शिक्षकांना काम लावत असल्याचे अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष भारत घुले यांनी स्पष्ट केले. याला अध्यापक संघ विरोध करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षकांना झाडे मोजण्याचे काम!
By admin | Published: September 10, 2014 10:45 PM