चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या कामगारांना फिल्मी स्टाइल दगडफेक करत तिघांनी बेदम मारहाण केली. चिपळूण शहरातील शिवाजीनगर बसस्थानक परिसरात सोमवारी, सायंकाळी घडली. घटनास्थळी पोलिस दाखल झाल्यानंतर मारहाण करणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.महामार्गावरील उड्डाणपुलाच्या कामासाठी आलेले कामगार शिवाजीनगर बसस्थानक परिसरात एक पत्र्याची शेड मारून राहत आहेत. सोमवारी (२३ जानेवारी) सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास पिलरच्या कामासाठी लोखंडी सळया क्रेनच्या साहाय्याने नेण्यात येत होत्या. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी क्रेनच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्या कामगारांनी त्यांना मज्जाव केला. याचा राग मनात घेऊन त्यांनी थेट दुचाकीवरून उतरून त्या कामगारांना मारहाण करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला बाचाबाचीनंतर थेट हाणामारी झाल्याने फिल्मी स्टाइलप्रमाणे त्या कामगारांवर दगडफेक करण्यात आली. यात कामगार जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मारहाण करणाऱ्यांना ताब्यात घेतले. यावेळी महामार्गावर बघ्याची मोठी गर्दी उसळल्याने काहीवेळ वाहतूक कोंडी झाली होती.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कामगारांना सिनेस्टाईलने मारहाण, तिघे ताब्यात; चिपळूणमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 12:27 PM