शिरगाव : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून अनेक वर्षे गंभीर स्वरूपाच्या आजारातील शस्त्रक्रिया व वैद्यकीय उपचार यांच्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. यामध्ये कोरोनाचाही समावेश करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे राज्य गुणवंत कामगार असोसिएशन अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
सद्यस्थितीत कामगार कल्याण मंडळाचे संचालक मंडळ अस्तित्त्वात नसल्याने कोरोनाविषयातील कोणताच निर्णय घेतला गेला नाही. सर्व प्रस्ताव प्रलंबित आहेत .परंतु अन्य सर्व योजना ऑनलाईन सुरू आहेत. मागील वर्षात झालेल्या लॉकडाऊनमुळे त्रस्त कामगार व कुटुंबीय कोरोनातही हलाखीचे दिवस काढत आहेत. अनेकांचे लाखो रुपये उपचारात खर्च झाले आणि उद्योग बंद राहिले. अशावेळी विशेष बाब म्हणून मंडळाने कामगारांच्या पाठीशी उभे राहून गंभीर आजार बाबीखाली कामगारांना मदत घ्यावी, अशी मागणी केसरकर व अन्य पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनातून केली आहे.