रत्नागिरी : युनेस्कोने २१ मार्च हा ‘जागतिक कविता दिवस’ म्हणून १९९९ पासून साजरा करण्याचे ठरवले. नवनिर्मितीचे... नवचैतन्याचे... नवसृष्टीचे स्वागत केले जाते. हाच धागा पकडत यंदा जनसेवा ग्रंथालयाने रत्नागिरीच्या साहित्यविश्वात प्रथमच साहित्यिक गुढी उभारली. रत्नागिरीची साहित्य चळवळ वृध्दींगत व्हावी, नवलेखकांद्वारे नवसाहित्य निर्माण व्हावे आणि अशा नवसाहित्याचे स्वागत करण्यास जनसेवा ग्रंथालय नेहमीच पुढे असेल, या उद्देशाने ही प्रतिकात्मक गुढी उभारण्यात आली होती.गाडीतळ येथील जनसेवा ग्रंथालयाच्या प्रांगणात ही साहित्यिक गुढी मान्यवरांच्या उपस्थितीत उभी करण्यात आली. यावेळी गुढीला मराठी साहित्यातील विविध प्रकारांपैकी बालसाहित्य, युवा, ललित, वैचारिक अशी मासिके, पुस्तके यांची माळ बांधण्यात आली होती. साहित्यिक पताका हे या गुढीचे खास आकर्षण होते.
जनसेवाचे वाचक सरपोतदार यांनी स्वत: मराठीतील महानुभाव पंथ, ज्ञानेश्वर ते विद्यमान नामवंत लेखकांची नावे, त्यांचा साहित्यिक कालखंड व साहित्यसंपदा अशी माहिती भगव्या पताकांवर लिहिली होती. अशा या नाविन्यपूर्ण साहित्यिक पताकांचे मान्यवरांनी कौतुक केले.कार्यक्रमाच्या शुभारंभी ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश दळवी यांनी संतगाथा व मराठी साहित्यातील ग्रंथांचे पूजन केले. या साहित्यिक गुढीच्या उभारणीमागील हेतू स्पष्ट केला. ते म्हणाले, जनसेवा ग्रंथालय रत्नागिरीची वाचन चळवळ आणि साहित्य चळवळ वृध्दींगत व्हावी, यासाठी नेहमीच प्रयत्नरत आहे. त्यासाठी वैविध्यपूर्ण उपक्रम नेहमीच राबवित आले आहे.
गुढी ही चांगल्या गोष्टीच्या स्वागतासाठी उभारली जाते. नवनिर्मितीच्या स्वागताला उभारली जाते. जनसेवा ग्रंथालयाने ती रत्नागिरीतील साहित्यिक चळवळ वृध्दींगत व्हावी, तसेच नवसाहित्यिक आणि त्यांच्या नवसाहित्य निर्मितीच्या स्वागतासाठी उभारली आहे. कोकणात आणि संपूर्ण रत्नागिरीत हा एकमेव आणि पहिलाच उपक्रम आहे. या गुढी उभारणीबरोबरच वाचकांसाठी यापुढेही नाविन्यपूर्ण उपक्रम देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.या कार्यक्रमाला ग्रंथालयाच्या उपाध्यक्षा सुमित्रा बोडस, कार्यवाह राहुल कुलकर्णी, कार्यकारिणी सदस्य काळे, नानिवडेकर, भाग्यश्री पटवर्धन, अमोल पालये, ग्रंथपाल सिनकर, वाचक, सभासद, रत्नागिरीकर नागरिक, कर्मचारीवर्ग उपस्थित होते.