अरुण आडिवरेकररत्नागिरी : लोकांशी संवाद साधण्याची माध्यमे बदलली आणि कोणतीही व्यक्ती केवळ एका टचच्या अंतरावर येऊन थांबली. सर्वांना एका टचवर जोडणाऱ्या या मोबाईलच्या दुनियेतरत्नागिरीत असे एक प्लॅनेट आहे जिथे माणुसकीचे, मैत्रीचे बंध चक्क दोन वेगवेगळ्या धर्माच्या पवित्र तसबिरींना एकाच ठिकाणी मानतात. केवळ मानतच नाहीत तर एकाच ठिकाणी पूजाही करतात. देव आणि अल्लाह यांच्या तसबिरी एकत्र ठेवून सर्वांनाच माणुसकीचा धर्म दाखवून दिला आहे. ठिकाण आहे मोबाईल प्लॅनेट नावाचं दुकान.सैफुद्दीन मुल्ला हे नोकरीनिमित्त पुणे येथून रत्नागिरीत आले. रत्नागिरीत आल्यानंतर नोकरीच्या निमित्ताने त्यांची महेंद्र बोरकर यांच्याशी ओळख झाली. या ओळखीतून पुढे मैत्री झाली. भिन्न धर्माचे असूनही दोघांनी आपल्या मैत्रीचा धागा इतका घट्ट बांधला आहे की, अन्य कोणत्याही धाग्याची त्यांना गरज भासली नाही.
मोबाईल क्षेत्रात गेली १० वर्षे कार्यरत असणारे महेंद्र बोरकर आणि ६ वर्षे काम करणारे सैफुद्दीन मुल्ला यांची ही अनोखी मैत्री आज सर्वांसाठीच आदर्शवत ठरली आहे. अनेक वर्षे नोकरी केल्यानंतर याच क्षेत्रात स्वत:चं वेगळं काहीतरी करावं या समान हेतूने दोघे एकत्र आले आणि भागीदारीत मोबाईलचा व्यवसाय सुरू केला. येथेच यांचं वेगळेपण सुरू होतं. जाती, धर्माची सर्व बंधने दूर करून दोघांनीही आपले हात व्यवसायानिमित्ताने मजबूत केले.नाचणे रोडवरील जोगळेकर स्टॉप येथे असणाऱ्या मोबाईल प्लॅनेट या दुकानात प्रवेश केला की, सर्वांचेच लक्ष वेधून घेतात त्या काऊंटरमागील शेल्फवर असलेल्या तसबिरी. दोन्ही भिन्न धर्माच्या तसबिरी एकाच ठिकाणी बघून नजर असलेली व्यक्ती प्रश्नकर्ती होतेच हे असं कसं?
या तसबिरीमध्ये एका बाजूला लक्ष्मी, गणपती, सरस्वती यांचा एकत्रित फोटो, तर त्याच्याच बाजूला अल्लाहचे नाव आणि कुरआनची आयत ठेवण्यात आलेली आहे. हे केवळ दाखवण्यापुरते नसून ही दोन्ही कुटुंब आनंदाने एकमेकांच्या सुखदु:खात, सणवार यात सहभागी होत असतात. जातीपातीचे उसळलेले लोण पाहता या दोघांचं नातं हा अनोखा आदर्शच!
नातेसंबंध अधिक दृढसैफुद्दीन मुल्ला हे नोकरीनिमित्त रत्नागिरीत आले. त्यांची सासुरवाडी जयगड येथे आहे. दोघांनीही एकत्रितपणे नोकरी केली. या नोकरीमध्येच त्यांची मने जुळली. या मैत्रीतून नातेसंबंध इतके दृढ झाले की, दुकानाचे उद्घाटन त्यांच्या आईवडिलांनी एकत्रितपणे केली.एकमेकांना केले कनेक्टइतरांना संवादाच माध्यम असलेले मोबाईल विकताना या दोघांनी खऱ्या अर्थाने एकमेकांना ह्यकनेक्टह्ण केले आहे. त्यांच्या या ह्यप्लॅनेटह्णवर भारतीयत्त्वाचा, एकोप्याचा, माणुसकीचा संवाद कोणत्याही साधनाशिवाय मनापासून साधत सर्वांनाच एक आदर्श घालून दिला आहे.
आम्ही दोघेही माणूस म्हणून एकत्र आलो. आमच्यासाठी जात, धर्म या दोन्ही गोष्टी गौण आहेत. धर्म आमच्या मैत्रीच्या आड येत नाही. म्हणूनच दुकान सुरू करताना आम्ही सर्वप्रथम भारतीय म्हणून एकत्र आलो. त्यानंतर धर्म. याचेच प्रतीक म्हणून या दोन्ही धर्माच्या पवित्र तसबिरींना आमच्या मनाप्रमाणेच आमच्या दुकानातही एकाच जागी तितकेच पूज्य स्थान आहे.- महेंद्र बोरकर
एकमेकांमध्ये मैत्री होण्यासाठी मुळात एकमेकांवर दृढ विश्वास हवा. विश्वास असला तर कोणत्याही जाती, धर्माची व्यक्ती असली तरी मैत्री व्हायला वेळ लागत नाही. एकत्र काम केल्याने एकमेकांची मने जुळली, स्वभाव जुळला आणि घरापर्यंत मैत्री आली. मैत्रीचा हा धागा जोडायला केवळ मोठ्या प्रसंगाची गरजच नसते, अगदी छोट्या-छोट्या गोष्टीतूनही मैत्री रूजत गेली.- सैफुद्दीन मुल्ला