खेड : खेड पोलीस स्थानकाच्या हद्दीत अलिकडेच सायबर गुन्ह्यात काहीशी वाढ झालेली आढळून आली आहे. खेड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी एकाही गुन्ह्याचा शोध अद्याप लागलेला नाही. येथे सायबर गुन्हे तपास यंत्रणा नसल्याने ही वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याकरिता पोलिसांना तशा प्रकारचे अधिकार देण्यात यावे किंवा जिल्ह्याला स्वतंत्र यंत्रणा निर्माण करणे आवश्यक असल्याचा सूर विविध भागातून आळवला जात आहे.अलिकडेच मोठमोठ्या शहरात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. इंटरनेटच्या माध्यमातून खातेदारांच्या खात्यावरून परस्पर पैसे काढण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. खेडमध्ये हे प्रमाण चिंताजनक आहे़ मोठमोठ्या ठिकाणी होत असलेल्या गुन्ह्यांचा प्रसार खेडमध्येही होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.खेडमध्ये दाखल झालेल्या सायबर गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. मोबाईलवरून खोटे नाव सांगणे, बँकेच्या अधिकाऱ्याचे नाव सांगून एटीएमचा नंबर मिळवणे, त्याद्वारे परस्पर पैसे काढले जातात. खेडमध्ये जून आणि जुलै महिन्यात अशा प्रकारच्या घटना सलग घडल्याने खेड तालुक्यासह जिल्ह्यात चिंता व्यक्त करण्यात येत आहे़ बँकेच्या मार्गदर्शक सूचनांचे ग्राहकांकडून वेळोवेळी पालन होत नाही. तसेच पोलिसांकडूनही सावधगिरीचे उपाय सुचवण्यात येतात़ त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. वर्षभरात खेड तालुक्यातील ग्रामीण भागात २ आणि शहरातील ५ सायबर गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. मात्र, सायबर गुन्ह्याकामी आवश्यक असलेली तपास यंत्रणा मुंबईमध्ये असल्याने येथील गुन्ह्यांचा छडा लावणे अशक्य झाले आहे. तपास यंत्रणेअभावी हे काम अशक्य असल्याने असे गुन्हे वाढत आहेत़ याकरिता स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची मागणी विविध भागातून होत आहे.जिल्ह्यात सायबर क्राईमची संख्या वाढत असताना या तपासासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत नसल्याने पालिसांकरवीच हा तपास केला जात आहे. या विषयाच्या तपासासाठी मुंर्बि पुणे यांच्यावर अवलंबून रहावे लागत असल्याने यामागील रॅकेट शोधून काढणे अवघड जाते. कोकणात मोबाईलवरून च्रिफिती पाठवणे, धमकावणे, बँकेचा अधिकारी आहे असे भासवून परस्पर पैसे काढणे, याखेरीज अनेक प्रकार या गुन्ह्यात समाविष्ट असून, या साऱ्या प्रकारांना पायबंद घालण्यासाठी योग्य तपास करणारी यंत्रणा या भागात असावी, ही गेल्या कित्येक दिवसांची मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही.कोकणात या पध्दतीचे गुन्हे गेल्या काही भागात वाढायला लागले असून, खेडमध्ये अशा गुन्ह्यांची दाखल झालेली संख्या कमी असली तरी ती चिंता व्यक्त करण्यासारखी आहे. जिल्ह्यात अशा गुन्ह्यांची तपास करणारी यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)कोकणात स्वतंत्र सायबर तपासाची मागणी गेले अनेक वर्षे केली जात आहे. मात्र, हा तपास करणारी यंत्रणा येथे नसल्याने अडचणी वाढतात.
खेडमध्ये सायबर गुन्ह्यांमुळे चिंता
By admin | Published: December 15, 2014 8:58 PM