मंडणगड : गतवर्षी काेराेना संसर्गाचा कमी प्रादुर्भाव झालेल्या मंडणगड तालुक्याला दुसऱ्या लाटेने चांगलाच हादरा दिला आहे. तालुक्यातील १०९ गावांपैकी २१ गावांमध्ये काेराेनाचा शिरकाव झाला असून, एक महिन्यात तब्बल ९४ काेराेनाचे रुग्ण आढळले आहेत. ही बाब तालुक्यासाठी चिंताजनक आहे.
गतवर्षी तालुक्यात केवळ १५० काेराेनाचे रुग्ण आढळले हाेते. पण, तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा चांगलाच फटका बसत आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसांत कोरोना संसर्गाच्या प्रमाणात वाढ झाली
असून ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केला आहे. महिनाभरात तालुक्यात ९४ रुग्ण आढळले आहेत. त्यामधील ५८ रुग्ण ॲक्टिव्ह रुग्ण असून, ३६ बरे रुग्ण झाले आहेत. तर तालुक्यात ६ कंटेन्मेंट झाेन तयार करण्यात आले आहेत. नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये कुंबळे प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत ३५ रुग्ण आढळले असून, २२ रुग्ण ॲक्टिव्ह असून, १३ रुग्ण बरे झाले आहेत. देव्हारे प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत ३१ नवे रुग्ण असून, २५ ॲक्टिव्ह तर ६ बरे झाले आहेत. पणदेरी प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत ३१ रुग्ण आढळले असून, ११ ॲक्टिव्ह तर २० रुग्ण बरे झाले आहेत.
कोरोना संसर्गाच्या पहिल्या टप्यात
कार्यरत झालेली ग्राम व वाडी कृती दल पुन्हा एकदा कार्यरत होण्याची
आवश्यकता आहे. लसीकरणाची मोहीम तीव्र करण्यासाठी
यंत्रणेने कृती दल पुन्हा कार्यरत करण्यासाठी पावले उचलेली आहेत. शहरातील बाजारपेठेत गुरुवारी भाजी, दूध व औषधे या जीवनावश्यक वस्तूवगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. मंडणगडचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुशांत वराळे व बाणकोट सागरी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक उत्तम पिठे
यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व मुख्य नाकात व गर्दी असलेल्या
चौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आवश्यक कामासाठी दुचाकी, तीनचाकी व खासगी गाड्यांतून शहरात येणाऱ्या संख्या लक्षणीय असल्याने शहरात अनावश्यक कामासाठी फिरणाऱ्यांची सक्तीने कोरोना चाचणी सुरू करण्याची
आवश्यकता व्यक्त झाली आहे. दरम्यान, बाहेरून तालुक्यात दाखल होणाऱ्यांना
बंधन घालता यावे या उद्देशाने म्हाप्रळ, कादवण व वेसवी फेरी बोट या ठिकाणी
तपासणी नाके कार्यान्वित करण्यात आले आहेत. महसूल प्रशासनाने नगरपंचायतीने या कालावधीत कोणत्या उपाययोजना कराव्यात यासाठी नगरपंचायत कार्यालयात सभा घेतल्याचे दिसून आले.