चिपळूण : तालुक्यातील पेढे कोष्टेवाडी येथे लोटे एमआयडीसीला पाणी पुरवठा करणारी जलवाहीनी फुटली. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. ढगफुटी पेक्षाही भयानक अनुभव येथील ग्रामस्थांना आला. या घटनेत पाण्याच्या प्रचंड वेगाने परिसरातील घरांमध्ये पाणी घुसले. सहा घरांतील विविध उपकरणांचे सुमारे १५ लाखाचे नुकसान झाले आहे. महसूल विभागाकडून या घटनेचा पंचनामा करण्यात आला.
पेढे येथून लोटे येथील एमआयडीसीला जलवाहीनीच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. दरम्यान मंगळवारी दुपारच्या सुमारास पेढे कोष्टेवाडी येथे ही जलवाहीनी फुटल्याची घटना घडली. पाण्याला प्रचंड वेग होता. त्यामुळे जलवाहीनीतील पाण्याच्या दाबामुळे परिसरातील सहा घरांत पाणी शिरले. काही घरांची कौले फुटून घरात पाणी शिरले. पाण्यास प्रचंड दाब असल्याने ग्रामस्थांना तत्काळ काहीच उपाययोजना करता येत नव्हत्या. हे पाणी घरात शिरल्याने विद्युत उपकरणांसह विविध साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच सरपंच प्रविण पाकळे यांनी घटनास्थळी धाव घेत प्रशासनाला माहिती दिली. तलाठी भारत जाधवर यांनी नुकसानीचा पंचनामा केला आहे. त्यानुसार स्वप्नील दगडू हळदे, प्रविण प्रकाश हळदे, विष्णू महादेव देंडे, उषा सखाराम कोळंबेकर यांच्यासह सहा जणांच्या घरांचे नुकसान झाले आहे. पेढे येथे वारंवार जलवाहीनी फुटण्याच्या घटना घडत आहेत. अडीच महिन्यापुर्वी देखील जलवाहीनी फुटल्याची घटना घडली होती. या घटनेतील सबंधीतांना १ लाख ३५ हजाराची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. मात्र नुकसान भरपाई महिनोमहिने मिळत नसल्याची ओरड ग्रामस्थांमधून केली जात आहे.