आॅनलाईन लोकमत देवरूख (जि. रत्नागिरी), दि. ८ : तालुक्यातील सुगम व दुर्गम शाळांचा आराखडा देवरुख पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून तयार करण्यात आला आहे. हा आराखडा चुकीचा व शिक्षणक्षेत्राची प्रगती रोखणारा असून, हा आराखडा केंद्रप्रमुख, विस्तार अधिकाऱ्यांबरोबरच शिक्षण विभागाने केवळ ‘व्हॉट्सअॅप’द्वारे माहिती घेत कार्यालयात बसूनच तयार केला असल्याचा आरोप पंचायत समितीच्या मासिक सभेमध्ये करण्यात आला.
शिक्षण विभागाची ही मनमानी खपवून घेतली जाणार नाही, असा सडेतोड इशाराच सदस्यांनी शिक्षण विभागाला देत शासनाच्या निकषांप्रमाणेच हा आराखडा तयार करण्याची मागणी या सभेत करण्यात आली. सभेत शिक्षण विभागावर सर्वाधिक ताशेरे ओढण्यात आले.
संगमेश्वर तालुका पंचायत समितीची मासिक सभा आज (गुरूवारी) पंचायत समितीच्या नवीन इमारतीत घेण्यात आली. यावेळी संगमेश्वर तालुका हा डोंगराळ भागातील असून, अनेक शाळा या डोंगरी भागात आहेत. ज्या शाळेत सायकलसुध्दा जात नाही, अशा शाळा सुगम दाखवून शिक्षण विभाग काय साध्य करणार आहे? असा प्रश्न उपस्थित करत सदर आराखडा चुकीचा असून, तो रद्द करून नव्याने सुगम व दुर्गम आराखडा तयार करावा, अशी मागणी सदस्य संजय कांबळे यांनी केली. यावेळी हा विषय इतर पंचायत समिती सदस्यांनीही उचलून धरला.
पंचायत समिती सदस्य जया माने व सभापती सारिका जाधव यांनी आराखडा नव्याने तयार करण्याला मान्यता देताना तसा ठराव संमत केला. शिक्षण विभागाने तयार केलेल्या सुगम व दुर्गम आराखड्यात तालुक्यातील दाभोळे - जोशीवाडी, दाभोळे कोंड, दाभोळे - बाऊलवाडी, चाफवली - भटाचाकोंड, कनकाडी - गुरववाडी, देवळे - बौध्दवाडी, कांगणेवाडी, भोवडे - बार्इंगवाडी या शाळा दुर्गम भागात असूनदेखील सुगम भागामध्ये दाखविण्यात आल्या होत्या. शिक्षण विभागाचा हा अजब कारभार सदस्य संजय कांबळे यांनी निदर्शनास आणून दिला.
अनेक ठिकाणी दुर्गम भागातील शाळा सुगम ठरवण्यात आल्या आहेत तर काही सुगम विभागात मोडणाऱ्या शाळांचा समावेश दुर्गम भागात करण्यात आला असल्याचेदेखील निदर्शनास आले. त्यामुळे हा आराखडाच रद्द करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. या सभेत आंबेड ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, असा ठरावदेखील सर्वानुमते करण्यात आला.
सभेला सभापती सारिका जाधव, सुजित महाडिक, जया माने, संजय कांबळे, सुभाष नलावडे, पर्शराम वेल्ये, अजित गवाणकर, सोनाली निकम, वेदांती पाटणे, शीतल करंबेळे, निधी सनगरे, प्रेरणा कानाल, स्मिता बाईत आदी सदस्य उपस्थित होते.