रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. कोकण विभागातून ३० हजार ९१९ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. परीक्षा गैरप्रकार व कॉपीमुक्त व्हावी, यासाठी नियमावलीमध्ये मंडळातर्फे काही बदल करण्यात आले आहेत.रत्नागिरी जिल्ह्यातील १५३ कनिष्ठ महाविद्यालयांतून २० हजार १४८ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. यामध्ये विज्ञान शाखेचे ५ हजार ४२९, कला शाखेचे ५ हजार ७२५, वाणिज्य शाखेचे ८ हजार ४०४ आणि एमसीव्हीसीच्या ५९० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९१ कनिष्ठ महाविद्यालयांतून १० हजार ७७१ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.
यामध्ये विज्ञान शाखेचे २८३० , कला शाखेचे २ हजार ५३४, वाणिज्य शाखेचे ४ हजार ४६३, तर एमसीव्हीसीच्या ९४४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कोकण विभागात ६० केंद्र असून, यातील रत्नागिरीमध्ये ३७, तर सिंधुदुर्गमध्ये २३ केंद्र आहेत. २२ परीरक्षक केंद्र असून, रत्नागिरीमध्ये १३, तर सिंधुदुर्गमध्ये ९ केंद्र आहेत.केंद्र संचालक हे प्रश्नपत्रिकांचे सीलबंद पाकीट पर्यवेक्षकांना देणार असून, परीक्षेपूर्वी काही मिनिटे अगोदरच प्रश्नपत्रिकांचे सीलबंद पाकीट पर्यवेक्षकांना दिली जाणार आहे. परीक्षेपूर्वी काही मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिकांचे सीलबंद पाकीट दोन परीक्षार्थींच्या स्वाक्षरीने फोडले जाणार आहे. यामुळे पेपर फुटण्यासारखे गैरप्रकार होणार नाहीत. गतवर्षीपासून या पद्धतीचा अवलंब केला जात आहे.तणावमुक्त, कॉपीमुक्त परीक्षेसाठी यापूर्वीच शाळांमधून जनजागृती अभियान राबविण्यात आले आहे. प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. पालकांचे मेळावे घेऊन त्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या होत्या.
कॉपी केल्यानंतर विद्यार्थ्यांवर कोणती कारवाई होते, याविषयी विद्यार्थी, शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. कोकण परीक्षा मंडळाअंतर्गत होणाऱ्या या परीक्षेसाठी कोकण परीक्षा मंडळानेही तयारी केली आहे.केंद्र्र संचालकांना बैठकीचे आयोजन करून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मंडणगड, खेड, चिपळूण, गुहागर, दापोलीमधील केंद्र संचालकांसाठी चिपळूणमध्ये बैठक घेतली जाणार आहे. रत्नागिरीमध्ये संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूरमधील केंद्र संचालकांची बैठक घेण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केंद्र संचालकांसाठी कणकवलीमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
सात भरारी पथकेकॉपीचे प्रकार टाळण्यासाठी सात भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये एका महिला विशेष भरारी पथकाचा समावेश आहे. माध्यमिक, प्राथमिक, निरंतर शिक्षणाधिकारी, डाएट प्राचार्य, गटशिक्षणाधिकारी यांच्या नेतृत्त्वाखाली भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. याशिवाय राज्य मंडळ सदस्यांचे एक पथक अशी सात पथके असणार आहेत. ज्या शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित आहे, तेथे सीसीटीव्हीद्वारे शाळेच्या परिसरावर लक्ष ठेवण्यात येणार आहे.- देवीदास कुल्लाळ, सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिकव उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोकण विभाग.