रत्नागिरी : जिल्ह्याचे मुख्य पीक असलेल्या आंबा पिकाच्या निर्यातीस चालना मिळावी, यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळातर्फे ग्लोबलगॅप प्रमाणिकरण अनुदान योजना चालू हंगामासाठी (२०१६-१७) राबविण्यात येणार आहे. युरोपियन देशांसह अमेरिका, जपान या देशांमध्ये आंबा निर्यात करण्यासाठी ग्लोबल प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यामुळे पणन विभागाशी शेतकऱ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.ग्लोबलगॅप प्रमाणिकरणासाठी हापूस आंबा, केशर आंबा उत्पादक इच्छुक शेतकऱ्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे ‘अपेडा’ मान्यताप्राप्त कोणत्याही एजन्सीतर्फे प्रमाणिकरण करून घेण्याची सूचना करण्यात आली आहे. कृषी पणन मंडळातर्फे ग्लोबलगॅप प्रमाणिकरणासाठी येणाऱ्या खर्चाच्या ५० किंवा ७५ टक्के रक्कम यापैकी जी रक्कम कमी असेल, ती वैयक्तिक शेतकऱ्यांचा ग्रुप (पीएमओ) यांच्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांनी प्रमाणपत्र सादर केल्यानंतर देण्यात येईल. अनुदानाची रक्कम कृषी पणन मंडळ, पुणेतर्फे लाभार्थींच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात येईल. रत्नागिरी विभागीय कार्यालयातर्फे इच्छुक शेतकऱ्यांचे प्रस्ताव सर्व बाबींची पूर्तता होत असल्यास विहीत मर्यादेनुसार अनुदानासाठी पात्र ठरणार आहेत. ग्लोबल गॅप प्रमाणिकरण अनुदान मिळण्याबाबत शेतकऱ्यांनी तारखेसह अर्ज सादर करावा. पीएमओअंतर्गत ग्लोबल गॅप प्रमाणिकरण अनुदान मिळण्याबाबतचा अर्ज तारखेसह सादर करणे आवश्यक आहे. अर्जासोबत शेतकऱ्यांनी सातबारा उतारा, त्रयस्थ एजन्सीमार्फत तयार केलेल्या प्रमाणपत्राची प्रत, विभागीय उपसरव्यवस्थापक यांचे अनुदान मंजुरीबाबतचे शिफारसपत्र, अर्जासोबत शेतकऱ्यांनी बँक तपशील देणे आवश्यक आहे.त्यामध्ये बँकेचे नाव, शाखेचे नाव, बँक खातेक्रमांक, आयएफसी कोड तसेच रद्द (चेक)धनादेशासह कागदपत्र सादर करावीत. संबंधित शेतकऱ्यांनी राज्य कृषी पणन मंडळाच्या रत्नागिरी विभागीय कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)पणनचे प्रयत्न : हापूसची परदेशवारी‘अपेडा’ मान्यताप्राप्त कोणत्याही एजन्सीतर्फे प्रमाणिकरण करून घेण्याची सूचना.अनुदानाची रक्कम लाभार्थींच्या बँक खात्यामध्ये थेट जमा.शेतकऱ्यांनी कृषी पणन मंडळाच्या रत्नागिरी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन.हापूस आंबा जास्तीत जास्त प्रमाणात परदेशात निर्यात व्हावा, यासाठी पणन विभाग प्रयत्न करीत आहे. गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांमध्ये हळूहळू सकारात्मक बदल होत असून, त्यामुळे आता परदेशातही कोकणी हापूस पोहोचू लागला आहे.
यावर्षीही ‘ग्लोबलगॅप’ अनुदान
By admin | Published: December 26, 2016 12:26 AM