संदीप बांद्रे
चिपळूण : तिवरे धरण फुटीत उद्ध्वस्त झालेल्या ५४ कुटुंबीयांच्या पुनर्वसनाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यापैकी पेढांबे येथे २४ घरांची उभारणी करण्यात आली असून, या घरांचे ७० टक्के काम पूर्णत्वास गेले आहे. अजूनही या कामासाठी सप्टेंबरपर्यंत मुदत असल्याने तोपर्यंत काम पूर्ण न झाल्यास तूर्तास संबंधित कुटुंबीयांना यावर्षीचा पावसाळा कंटेनरमध्येच काढावा लागणार आहे.
तालुक्यातील तिवरे धरण २ जुलै २०१९ रोजी झालेल्या अतिवृष्टीत फुटले. या दुर्घटनेत तब्बल २३ जणांचा बळी गेला. तसेच ५४ कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले. या दुर्घटनेत भेंदवाडीतील २२ घरे, जनावरांचे गोठे पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेले. बाधितांचे तत्काळ तात्पुरते पुनर्वसन करण्यासाठी कंटेनर केबिनचा पर्याय निवडण्यात आला. या कंटेनरमध्ये आजही १५ कुटुंंबे राहत आहेत. त्यांना कायमस्वरूपी घरासाठी अलोरे येथे कोयना प्रकल्प वसाहतीत २४ घरे बांधण्याचे काम सुरू आहे.
दोन ठेकेदारांच्या माध्यमातून प्रत्येकी १२ घरे उभारण्यात येत आहेत. त्यासाठी सिद्धिविनायक ट्रस्टतर्फे पहिल्या टप्प्यात पाच कोटींचा निधी प्राप्त झाला आहे, तर अजून सहा कोटी रुपये या संस्थेकडून प्रकल्पासाठी मंजूर केले आहेत. सुमारे ११ कोटी रुपयांचा निधी या ‘सिद्धिविनायक नगरी’ पुनर्वसनासाठी मंजूर केला आहे. अजूनही पेढांबे येथे १६ कुटुंबीयांचे पुनर्वसन बाकी आहे. त्यासाठी दुसऱ्या टप्प्यात निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. याशिवाय तिवरे गावी उर्वरित १४ कुटुंबीयांचे पुनर्वसन होणार आहे. मात्र, अजूनही या कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी जागा उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे या कुटुंबीयांनाही यावर्षीचा पावसाळा कंटेनरमध्येच काढावा लागणार आहे.
...................................
कंटेनरमधील जगणे झाले नकोसे
तिवरे धरण फुटीच्या घटनेनंतर तत्काळ कंटेनरची व्यवस्था करून तात्पुरते पुनर्वसन केले आहे. त्यानंतर आजतागायत येथील कुटुंबीय कंटेनरमध्येच राहत आहेत. वाढत्या उन्हामुळे या कंटेनरमधील जीवन नकोसे झाले आहे. तापलेल्या कंटेनरमध्ये गर्मी होत असल्याने हे कुटुंबीय हैराण झाले आहेत.
..............................
पुनर्वसन कुटुंबीयांनी भरले वीज बिल
गेले काही महिने वीज बिल शासनाने भरलेलेच नाही. त्यामुळे वीज बिल स्वरूपात ६९ हजार रुपये थकीत होते. महावितरणने वीज पुरवठा खंडित केला होता. ऐन उन्हाळ्याच्या कडाक्यात वीज पुरवठा खंडित झाल्याने बाधित कुटुंब हैराण झाली होती. मात्र, आता त्यापैकी १० हजार रुपयांचे वीज बिल संबंधित कुटुंबीयांनी भरल्याने तूर्तास वीज पुरवठा पूर्ववत सुरू केला आहे.
.................................
धरणाच्या पुनर्बांधणीकडे दुर्लक्ष
तिवरे धरण फुटी प्रकरणी दोनवेळा चौकशी अहवाल तयार करण्यात आला असला तरी तो अद्याप उघड करण्यात आलेला नाही. त्यानंतर धरणाच्या परिसरातील माती, पाणी व कातळाची तपासणीही करण्यात आली. मात्र, अजूनही पुनर्बांधणीबाबत कोणत्याही हालचाली सुरू नाहीत. परिणामी पूर्व विभागातील पाणीपुरवठा योजना अडचणीत आल्या आहेत.
........................
तिवरे धरण फुटीच्या घटनेनंतर २१ महिन्यांचा कालावधी वाया गेला. मात्र, आता पेढांबे येथे सुरू असलेले पुनर्वसनाचे काम समाधानकारकपणे सुरू आहे. आतापर्यंत २४ घरांचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच हा प्रकल्प मार्गी लागणार आहे. अजूनही उर्वरित घरांचा प्रश्न कायम असून, तातडीने निविदा प्रक्रिया शासनाने राबविणे आवश्यक आहे.
- तानाजी चव्हाण, तिवरे
........................
तिवरे धरण फुटीतील ५४ कुटुंबीयांपैकी १४ कुटुंबांचे पुनर्वसन तिवरे येथेच केले जाणार आहे. अजूनही त्या कुटुंबीयांसाठी जागेचा शोध घेतला जात आहे. त्यावर वेळीच निर्णय घेऊन गावातील पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा. त्याचबरोबर धरणाच्या पुनर्बांधणीसाठी वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. त्यावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजना अडचणी आल्या आहेत.
- तुकाराम कानावजे, ग्रामस्थ, तिवरे.
.................................
अजूनही सप्टेंबरपर्यंत पेढांबे येथील कामाची मुदत आहे. २४ घरांचे स्लॅब व प्लास्टरचे काम पूर्ण झाले असले तरी अजूनही अंतर्गत काम शिल्लक आहे. कोणतीही गडबड न करता सावकाश काम केले जात आहे. त्यामुळे या कामासाठी वेळ जाणार आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत कामाची मुदत संपण्यापूर्वीच संबंधीत कुटुंबीयांच्या ताब्यात घरं देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- दशरथ दाभोळकर, ठेकेदार, खेर्डी, चिपळूण
फोटो- तिवरेतील दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांच्या पुनर्वसनाचे पेढांबे येथे सुरू असलेले काम अंतिम टप्प्यात आले आहे.
सिंगल फोटो -
१) तानाजी चव्हाण २) तुकाराम कानावजे ३) ठेकेदार दशरथ दाभोळकर