मंडणगड : कोरोनामुळे शिमगाेत्सवासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. गर्दी न करता शिमगाेत्सव साजरा करण्याचे आवाहन तहसीलदार व पाेलीस प्रशासकडून करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत तालुक्यात गावाेगावी उत्सव साजरा करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यामुळे यावर्षी पालखी महाेत्सव गावातच साजरा हाेणार आहे.
यावर्षी शहरात विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून साजरा केला जाणारा पालखी नृत्य महोत्सव साजरा केला जाण्याची शक्यता मावळली आहे. प्रत्येक पालखी गावागावात अतिशय मोजक्या लोकांच्या उपस्थितीत कोरोना नियमावलीचे शंभर टक्के पालन करत साजरा करण्यात येणार आहे. या आव्हानास तालुकावासीयांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे पालख्यांचे पहिल्या व दुसऱ्या होमानंतर होणारे सीमाेल्लंघन व वेगवेगळ्या गावातील मानकऱ्यांना व घरघरात भेटी देण्याचा कार्यक्रम होणार नसल्याने व पालख्यांची गाड्यातून होणारा प्रवासही टाळला जाणार आहे.
शहराच्या पालखी महोत्सवात सहभागी होणाऱ्या बोरघर, तोंडली, कोंझर, टाकवली, आतले, पाचरळ, कोन्हवली, गोकुळ गाव, माहू, तुळशी आंबवणे, वडवली येथील पालख्या यंदा मंडणगड शहराचे व त्यांच्या मार्गावरील गावांची भेट यंदा घेणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याचबरोबर यंदा ग्रामीण भागातून शहरात शिमगोत्सवात दाखल होणारे खेळे, डेरा, कोळीनृत्य ही शिमगोत्सवातील सोंगेही फिरणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
चाैकट
परवानगीचा प्रस्ताव
गावांतर्गत पालखी फिरवण्यासाठी गवणावाडी, गोवेले, बुरी, ढांगर, सुर्ले, पाट, मनवळवाडी, टाकवली, अडखळ, कोझर, आसावले, रातांबेवाडी, घोसाळे या गावांनी आजअखेर गावांतर्गत पालखी फिरवण्यासाठी तहसील कार्यालयात परवानगी मागितली आहे. या प्रक्रियेत आणखीन गावेही समाविष्ट होणार आहेत.