राजापूर : शहरातील विविध चव्हाटा मांडावरील मानकऱ्यांच्या ग्रामदेवता निनादेवी मंदिरात झालेल्या सभेत यंदाचा शिमगोत्सव शासनाच्या आदेशाप्रमाणे प्रातिनिधिक स्वरूपात साजरा करण्याचे ठरवण्यात आले.
कोविडचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असल्याने यंदाच्या शिमगोत्सवात गावातील होळ्या खेळविल्या जाणार नाहीत. त्या न खेळविता मांडावर उभ्या केल्या जातील. त्यावेळी ठरावीक भाविक सोशल डिस्टन्स पाळून मास्क घालून असतील. ढोल अगर ताशे वाजविण्यात येणार नाहीत. पौर्णिमेचा होमसुद्धा छोट्या स्वरूपात केला जाईल. रोंबट रात्री दहापूर्वी ठरावीक माणसांच्या उपस्थितीत काढण्यात येईल. रंगपंचमीही इतर कोणाच्या अंगावर रंग न उडविता ठरावीक माणसांमध्येच साजरी करण्यात येईल, असे निर्णय या सभेत घेण्यात आले.
कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी यंदाचा संपूर्ण शिमगोत्सव शासनाच्या आदेशाप्रमाणे अटी पाळून साधेपणाने साजरा करण्याचे या सभेत ठरले. त्याप्रमाणे निवेदन पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर तसेच उपविभागीय अधिकारी प्रवीण खाडे यांना देण्यात आले. यावेळी ग्रामदेवता निनादेवीचे ट्रस्टी नंदकुमार चव्हाण, बापू चव्हाण, जवाहर चौक येथील देव चव्हाटा व कामादेवी मंडळाचे व्यवस्थापक विनोद गादीकर, महापुरुष मंडळ बंदर धक्क्याचे बाळ माणिक, हनुमंत प्रासादिक मंडळ वरची पेठचे गिरीश शेट्ये आदी उपस्थित होते.