तो पाऊसच वेगळा होता हो ! सगळ्यांना रोमांचून टाकायचा, कधी कोल्ह्याचं लग्नंही लावण्याचा घाट तो आवर्जून घालायचा, आवडायचा मला तो. जो मुद्दाम मला भिजवण्यासाठी यायचा. सुखद आठवणी म्हणून गावात छान हिरवी चादर पांघरूण जायचा.
आता ना ! हा माझा मित्र कोल्ह्याचं लग्नं लावायचा घाट घालतो. ना ! कधी हलक्या सरींनी मला भिजवून टाकतो. आता येतो तोच त्याच्या वेगळ्या मित्राला घेऊन. येण्याआधीच वादळाची पूर्वसूचना मिळते आणि पाऊस येणार या भीतीने रोमांच नाही तर भीतीने अंगावर कापरे भरते. त्याची हिरवीगार चादर त्याने आता घडी घालून ठेवली आणि त्याबदल्यात घरांच्या तुटलेल्या भिंती आणि जमीनदोस्त झालेले संसार बघायची वेळ आली.
फार वाईट वाटते पावसाचे हे बदलले रूप बघून आणि नुकसान झाले म्हणून गालावर गळणारी आसवे बघून. कधी वाटते रुसावे त्याच्यावर हक्काने पण, मग मात्र कळते तोही चिडलाय माझ्यावर त्याच नात्याने ! झाडं कापली म्हणून तो चिडलाय, तलावाचे अस्तित्व बुजवून आम्ही त्यावर संसार थाटले, म्हणून तो त्याचा बुजवलेला संसार बघून घुसमटलाय. कळतंय सगळं काही कळतंय. का होतंय असं होत्याचं नव्हतं आणि का होतंय त्याचं रौद्र रूप घेऊन भेटीला येणं. आपल्याला वळत नाही याचं मात्र त्याला आता वाईट वाटतंय. रोज नव्याने बुजवले गेलेले त्याचे संसार बघून तोही मग आता पेटून उठतोय.
नदीचा प्रवाह आपण बदलला आणि कुठेतरी तर तो नाहीसाही केला. दरवर्षी भेटणारी माझी नदी ताई भेटली नाही म्हणून तो कधीतरी ढसाढसाही रडला. त्याची आतुरतेने वाट बघत बसणारे डोळे राहिले नाहीत मग, ‘कोणासाठी घेऊन यायचे हे सप्तरंग इंद्रधनुष्याचे मी ?’ असं काहीतरी तो आता मनाशीच हितगुज करायला लागलाय.
पाण्यात होड्या सोडणारे हात आता नाहीसे झाले, चिखलात उड्या मारून गोंगाट करणारे दिवस आता पडद्याआड झाले. तो गोंगाट ऐकावा म्हणून त्याने जर कानोसा घेतला तर ‘जर्म्स (जंतू) असतात पावसाच्या पाण्यात, जाऊ नकोस चिखलात !’ असं काहीतरी त्याला आता ऐकू येतं. आणि मग त्याच आल्या पावली तो निघून मागं जातो.
विकासाच्या योजना आखताना पावसाला मात्र आपण परकं केलं. त्याच्या सगळ्या नियोजनबद्ध कारभाराचे नकाशे बदलून आपलं गणित आपण मांडून घेतलं.
होय ! खरचं तो रुसलाय. माझ्यावर, तुमच्यावर आणि सगळ्यांवरच.
- निधी जोशी - खेर
टिळक आळी, रत्नागिरी