चिपळूण : गुहागरचे आमदार भास्कर जाधव व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाल्याची चर्चा चार दिवस सुरू होती. अखेर याबाबत आमदार जाधव यांनी स्वत: खुलासा करत, होय आपली भेट झाली आणि आपल्याला शिवसेना प्रवेशाचे आमंत्रण उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले. आता, याबाबत कुटुंब आणि कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेऊ, असेही सांगितले. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याचे संकेत मिळाले आहेत.
बुधवारी सकाळी ११ वाजता आमदार जाधव यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पुत्र समीर, विक्रांत जाधव व कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार जाधव यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे व आपली १५ वर्षानंतर भेट झाली. त्याआधी पवार साहेबांनी मंत्री केल्यावर स्व. शिवसेनाप्रमुख यांनी फोन करून अभिनंदन केले होते व मोठा हो असा आशीर्वाद दिला होता. मात्र, त्यानंतर प्राथमच उद्धव ठाकरे यांची भेट झाली. त्यावेळी २०१४च्या निवडणुकांवेळी पक्षाकडून अन्याय झाल्याचे स्पष्ट करून त्याची कारणे काय, कशामुळे अन्याय झाला त्याला कोण जबाबदार होते याविषयी असलेले मळभ या भेटीत दूर झाले. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेना प्रवेशाचे आमंत्रण दिल्याचे सांगितले.
भास्कर जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचे वृत्त समोर आल्यानंतर भास्कर जाधव यांनी त्याचा इन्कार केला होता. आपण मुंबईत असून, दोन चित्रपट पाहिल्याचे सांगितले होते. मात्र, या भेटीचे वृत्त शिवसेनेचे मुखपत्र असलेले सामनामधून प्रसिद्ध झाल्याने या भेटीवर शिक्कामोर्तब झाले होते. त्यानंतर या भेटीत नेमके काय घडले होते, याबाबत उत्सुकता होती. भास्कर जाधव यांच्या या भेटीमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरण पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता आहे. या भेटीमुळे कोणाचे पत्ते कापले जाणार, हेच पाहायचे आहे.