रत्नागिरी : कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही. जेव्हा येईल रिफायनरी... संपून जाईल बेकारी, अशा घोषणांमध्ये रिफायनरी प्रकल्प समर्थकांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यात नाणार, सागवेसह प्रकल्प क्षेत्रातील ग्रामस्थांसह जिल्ह्यातील व्यापारी, उद्योजक, विविध संघटना आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आजवर प्रकल्प नाकारण्यासाठी अनेक मोर्चे निघाले. मात्र प्रकल्प हवा आहे, अशा मागणीचा हा कोकणातील पहिलाच मोर्चा होता.
रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोलिअम कॉर्पोरेशन लिमिटेड (आरआरपीसीएल) प्रकल्प नियोजित जागीच व्हावा, यासाठी प्रकल्प समर्थक मोठ्या संख्येने शनिवारी रस्त्यावर उतरले. मारूती मंदिर सर्कलजवळून मोर्चाला सुरूवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालय आवारात सभा झाली. कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अविनाश महाजन आणि कोकण विकास समितीचे टी. जी. शेट्ये यांनी मोर्चाची पार्श्वभूमी सांगितली. शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना निवेदन दिले.
सातबारासह ग्रामस्थ हजर : मोर्चात नाणार, सागवे, तारळ, कात्रादेवी यासह प्रकल्प क्षेत्रातील गावांमधील अनेक ग्रामस्थ सातबारा उतारेच सोबत घेऊन आले होते.