लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे उंबरवाडी येथील माधव हरी भावे भातशेतीसह भाजीपाला उत्पादनासह जोडव्यवसाय म्हणून ‘दुग्ध व्यवसाय’ करीत आहेत. याशिवाय आंबा, काजू, कोकम, फणस या कोकणी मेव्यापासून विविध उत्पादनांची निर्मिती करून विक्री करीत आहेत. भातशेतीतून ५० गुंठे जमिनीतून २८८० किलो उत्पादन घेत आहेत.
माधव भावे सध्या ७० वर्षांचे आहेत. अकरावी मॅट्रिक झाल्यानंतर भावे यांनी नोकरीसाठी प्रयत्न न करता शेतीकडे लक्ष केंद्रित केले. गेली ४० वर्षे ते शेती व्यवसायात आहेत. वडिलोपार्जित जमिनीमध्ये भातशेती, त्यानंतर भाजीपाला, शिवाय उर्वरित जमिनीवर आंबा, काजू, नारळ, सुपारी लागवड केली आहे. सेंद्रिय उत्पादनावर विशेष भर असल्यामुळे त्यांच्याकडील भात, भाज्या तसेच फळांचा दर्जा तर चांगला आहे, शिवाय उत्पादकताही उत्तम आहे. पन्नास गुंठे जमिनीवर भाताचे उत्पादन घेत असून त्यांना पावणेतीन ते तीन हजार किलो भात उत्पादन प्राप्त होत आहे.
भात काढणीनंतर भाजीपाला लागवड करीत आहेत. बागायतीसह दूध व्यवसायातून उत्पन्न मिळवत आहेत. पारंपरिक पद्धतीने शेती करीत असताना, व्यावसायिकता जोपासली आहे. कमी जागेत जास्तीतजास्त उत्पादन ते मिळवत आहेत.
दुग्ध व्यवसायाची जोड
माधव भावे यांनी शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड दिली आहे. चार म्हशी व एका गायीचा सांभाळ केला असून शेतीसाठी नांगरणीकरिता बैलजोडी आहे. दररोज ते दूध रत्नागिरी शहरात जाऊन विक्री करीत आहेत. शेण व गोमूत्रापासून खत व जीवामृताची निर्मिती करीत आहेत. शेतीसाठी त्याचा वापर करीत असल्याने उत्पादन व दर्जा राखण्यात ते यशस्वी ठरले आहेत. सेंद्रिय शेतीवर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.
मिरची उत्पादन
सर्व प्रकारच्या पालेभाज्यांसह कोथिंबीर, वांगी, चवळी, पावटा लागवड करीत आहेत. याशिवाय, लोणच्यासाठी लागणा-या गावठी हिरव्या मिरचीचे ते उत्पादन घेत आहेत. १०० ते १२० रुपये किलो दराने मिरची विकली जात असल्याने मिरची लागवडीतून चांगला फायदा होत असल्याचे सांगितले. गावठी वांगी तसेच लाल व तांबडी चवळी लागवड करून उत्पादन घेत आहेत. स्थानिक पातळीवरच विक्री होत आहे.
मका लागवड
दुभती सहा तर नांगरणीसाठी दोन मिळून आठ जनावरे आहेत. दुभत्या जनावरांना बारमाही ओला चारा मिळावा, यासाठी पावसाळ्यानंतर ते मका लागवड करीत आहेत. खाण्यासाठी मका उपलब्ध होतोच, शिवाय दुभत्या जनावरांसाठी पोषक खाद्य असल्याने दुधाचा दर्जा चांगला राहतो. शिवाय, दूधही भरपूर प्राप्त होते.
बागायतीतून उत्पन्न
भावे यांनी १७० काजू, १०० नारळ, २०० सुपारी, १० फणस व ५ आंबा कलमांची लागवड करून उत्पादन घेत आहेत. कोकमपासून सरबत, शिवाय फणसपोळी, आंबापोळी यासारखे उत्पादन घेऊन विक्री करीत आहेत. बागायतीबरोबर प्रक्रिया उत्पादनातून उत्पन्न मिळवत आहेत. चांगल्या दर्जामुळे विक्रीही हातोहात होते.