गुहागर : आठवेळा त्या पक्षाबरोबर निवडणूक लढवलीत, सरकारमध्ये काम केलं, त्या पक्षावर खालच्या पातळीवर टीका करता. तुमच्या निष्क्रीयतेमुळे तुम्ही पराभूत झालात, तुम्हाला कोणावरही टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही, असा टाेला खासदार सुनील तटकरे यांनी माजी खासदार अनंत गीते यांना गुहागर येथील सभेत लगावला.
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील भवानी सभागृहात महायुतीच्या निवडणूक नियोजन बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कोकणाचे भवितव्य बदलणारा शिवडी नावाशिवा अटल सेतू ठरणार आहे. सागरी महामार्गाबरोबरच ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस वे पूर्ण करण्याची जबाबदारी माझी राहील, असे ते म्हणाले. सत्ता हे उपभोगण्याचे साधन नाही तर जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे. टीका करून प्रश्न सुटत नाहीत हे गीतेंनी लक्षात घेतले पाहिजे.कुणबी भवन बनवण्यासाठी समाजाकडून अडीच कोटी मागण्यात आले. अजित पवार यांच्या माध्यमातून यावेळी पाच कोटी देऊन अनेक वर्षाचा कुणबी भवनाचा प्रश्न मार्गी लावला आहे. अनेक वर्ष माझ्या विरोधात काम करणारा भाजप पक्ष माझ्याबरोबर आहे. भाजप कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या घड्याळावर मतदान करा, सांगणे कठीण आहे हे मी समजू शकतो, असेही तटकरे म्हणाले.
यावेळी विनय नातू म्हणाले की, त्यांच्या पक्षातील आमदार त्यांचा प्रचार करायला येतील की नाही हे सुद्धा माहिती नाही. ज्या शिवसेना पक्षाने त्यांना मोठ केले, त्या पक्षालाही सोडले, ज्या पक्षाने पक्षाचा अध्यक्ष केला, मंत्री केल त्यांनाही आता युती शिवाय पर्याय नाही हे लक्षात आल्यानंतर पक्ष सोडला, असा टाेला त्यांनी आमदार भास्कर जाधव यांना लगावला.
यावेळी मधुकर चव्हाण, शशिकांत चव्हाण, तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, नीलेश सुर्वे, दीपक करंगुटकर, शरद शिगवण, राजेश बेंडल, नीलम गोंधळी यांनीही मार्गदर्शन केले.