तो शास्त्रज्ञ त्याच्या कारने इकडे कोकणात आला. त्याने त्याचं नाव जाहिरातीत दिलंच होतं, निस्सीम पटवर्धन. त्याने... निस्सीमने त्या भूतबंगल्याची पाहणी केली. मूळ कागदपत्रं तपासले. तो जुना बंगला विकून देण्याची जबाबदारी फार पूर्वी तिथं राहणाऱ्या घरमालकाने माझ्यावर सोपवली होती. निस्सीमला रानात, अगदी शांत ठिकाणी असलेलं ते झपाटघर खूपच आवडलं. इतक्या मोठ्या, पण जुनाट घराचं खरेदीखत अवघ्या वीस लाखात केलं. वास्तविक ही तर ब्लाॅकची किंमत होती.
निस्सीमने महिनाभर तिथे मुक्कामच ठोकला. दापोलीतून माझ्या ओळखीचे कामगार नेऊन बंगला चकाचक केला. रंग काढला. त्याचं रूपच बदलून टाकलं. निस्सीम मुद्दाम त्या भूत बंगल्यात एकटा राहिला. व्यवहारातला एजंट म्हणून माझे पैसे, माझा हिस्सा मला मिळलाच.
मुख्य म्हणजे शास्त्रज्ञ निस्सीमला कसलाही त्रास झाला नाही. भास झाले नाहीत. कारण अशा गोष्टींवर त्याचा मुळी विश्वासच नव्हता. त्यामुळे तिथं सुरुवातीला एकटा राहूनही निस्सीम पटवर्धनला भयानक स्वप्ने वगैरे अजिबात पडली नाहीत. हवेत तरंगणारा दिवाही दिसला नाही.
सध्या निस्सीम पुण्यात आहे. त्याने मला मित्रच मानलं आहे. त्या घराची एक चावी माझ्याकडे देऊन ठेवली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन करणारी एक एकांकिका मी आणि माझा सहकारी शिर्के आम्ही बसवत आहोत. या नाटकाच्या तालमी आम्ही निस्सीमच्या त्या जंगलातल्या घरात घेतो. रात्री तालमी चालतात. पण मला आणि शिर्केला कधीही भुताटकीचा अनुभव आला नाही. सहकारी पीयूष शिर्के मला विचारू लागला, सर, तुमच्या या एकांकिकेला तुम्ही अजून नाव दिलेलं नाही. नाटक नीट बसवलं आपण... आणि त्याला अजून नाव नाही. स्पर्धेत उतरवताना अगदी ती ऑनलाईन असली तरी, टायटल हवंच. मी म्हटलं ‘पीयूष’ नाटकाचं नाव ठरलं.
काय सर? उगाच घाबरतो आपण! शिर्केला ते शीर्षक खूपच आवडलं. मित्रांनो, आपण स्वत: एखादा अनुभव घेतल्याशिवाय कधीच विश्वास ठेवू नये. सांगोसांगी वडाला वांगी. असं नको. एकदा मनातली भीती काढून टाकली की, भूतबंगलासुद्धा राहण्याच्यादृष्टीने उत्तम बनतो... स्वस्तात मस्त! द्या टाळी.
- माधव गवाणकर, दापोली