नाणार प्रकरणावर आता शिवसेना खासदार विनायक राऊत आणि निलेश राणे आमने-सामने आले आहेत. निलेश राणेंनी काल पत्रकार परिषद घेऊन नाणार प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा मावस भाऊ निशांत देशमुख आणि त्यांच्या कंपनीचे हितसंबंध गुंतले असल्याचा आरोप केला होता. त्याला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. माजी खासदार नीलेश राणे कधीही अभ्यास करून बोलत नाहीत आणि ते शुद्धीत बोलत नाहीत, असं विनायक राऊत म्हणाले होते. त्यावर निलेश राणेंनी पुन्हा एकदा पलटवार केला आहे. निलेश राणे म्हणतात, नाणार रिफायरनरीसंदर्भात काल मी पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेमध्ये मी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची नावं, त्यांचे घोटाळे, त्यांचे भ्रष्टाचार, सर्व्हे नंबर, गट नंबर हे सर्व पुराव्यांनिशी पत्रकारांसमोर सादर केले होते. त्यांच्यात मुख्यमंत्र्यांचा मावस भाऊ निशांत देशमुख, त्याची कंपनी अन् व्यवहार पुराव्यांनिशी पत्रकारांसमोर ठेवले होते. ते आज विनायक राऊतांना दुखलं. शिवसेनेच्या पोटात दुखायला लागलं. कसलेही पुरावे विनायक राऊतांनी सादर केले नाहीत. फक्त माझ्यावर नेहमीप्रमाणे टीका केली. मी जे पुरावे म्हणून कागदपत्र सादर केले, ते वाचावे लागतील, त्याचा अभ्यास करावा लागेल. पण विनायक राऊतांकडून त्याची अपेक्षा ठेवू नका, कारण ते १०वी नापास आहेत.१०वी नापास माणूस हे सर्व करू शकेल हे शक्य नाही. मला दोनच प्रश्न विचारायचे आहेत. निशांत देशमुख हा उद्धव ठाकरेंच्या मावशीचा मुलगा लागतो की नाही? आणि सुगी कंपनीचा तो संचालक आहे निशांत देशमुख, सुगी कंपनीनं नाणारमध्ये व्यवहार केले की नाही, एवढंच मला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगावं, असंही निलेश राणे म्हणाले आहेत.
मी दिलेले पुरावे वाचावे लागतील, १०वी नापास व्यक्तीकडून ती अपेक्षा नाही, निलेश राणेंचं टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 9:03 PM