देवरूख : आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडताना तरूण- तरूणींच्या खूप अपेक्षा असतात. या अपेक्षांना संगमेश्वर तालुक्यातील लोवले दोरखडेवाडी येथील तरूणाने बगल दिली आहे. येथील दीपक यशवंत दोरखडे याने फटकरेवाडी येथील मूकबधीर तरूणी गीता सोमा फटकरे हिच्याशी शनिवारी विवाह केला. त्याचदिवशी सायंकाळी श्री सत्यनारायणाची पूजाही झाली. दीपकच्या या धाडसी निर्णयाचे तालुकावसीयांनी कौतुक केले असून, त्याने एक आदर्श समोर ठेवला आहे.लोवले फटकरेवाडी येथील सोमा फटकरे यांना तीन मुली असून, दोन मुलींचा विवाह झाला आहे. तर गीता ही जन्मताच मूकबधीर होती. गीताचे सातवीपर्यंत शिक्षण झाले आहे. ती मूकबधीर असल्याने तिचा विवाह होत नव्हता. त्यातच वडील आजारी असल्याने संसाराचा सर्व भार गीताची आई सुमित्रा यांच्यावर पडत होता. त्या देखील मोलमजुरी करूनच संसाराचा गाडा हाकत होत्या.गीता ही कामात हुशार व दिसायला देखणी होती. मात्र, केवळ ती मूकबधीर असल्याने तिचे लग्न जमण्यात अडथळा येत होता. दोरखडे वाडीतील दीपक दोरखडे याने गीताशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय दीपकने आपल्या आई- वडिलांना सांगताच त्यांनादेखील प्रथम धक्का बसला. आई-वडिलांची समजूत काढताना दीपकने गीताचे मूकबधीरपणा हा तिचा दोष होऊ शकत नाही, असे सांगितले.
तिचे हे एक कमीपण सोडले तर तिच्यात नाव ठेवण्यासारखे काहीच नसल्याचे त्याने आई-वडिलांना सांगितले. त्यानंतर दीपकच्या वडिलांनी गीताच्या आई- वडिलांशी लग्नासंदर्भात चर्चा केली. दोन्ही वाडीतील ग्रामस्थांनी एकत्र येत चर्चा करून दीपक व गीताच्या लग्नाची तारीख नक्की केली. यानुसार ९ रोजी कसबा येथील श्रीराम मंदिरात श्रीकांत बेडेकर यांनी कमी पैशात हे लग्न लावून दिले. पौराहित्य नाना बापट यांनी केले. साध्या पध्दतीने ग्रामस्थांच्या उपस्थितीत दीपक व गीताचा लग्नसोहळा पार पडला.