लाेकमत न्यूज नेटवर्क
संदीप बांद्रे
चिपळूण : शहरातील भाेगाळे परिसरातील परिचारिकेवरील अत्याचाराप्रकरणी पाेलिसांच्या ताब्यात सापडलेल्या तरुणाची वाईट सवयच अंगाशी आल्याचे तपासात पुढे आले आहे़ हा तरुण चांगल्याप्रकारे मराठी बाेलत असून, त्याला गुटखा खाण्याची सवय हाेती. तरुणीनेही त्याने गुटखा खाल्ल्याचे सांगितल्याने पाेलिसांना त्याला ओळखणे साेपे झाले. त्याची ही सवयच त्याला पाेलिसांच्या ताब्यात देण्यास पुरेशी ठरली़
या परिचारिकेवर अत्याचार झाल्यानंतर पीडित तरुणीने नराधमाच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतली आणि तेथून मदतीसाठी धाव घेतली. याचवेळी भोगळे येथे एक व्यक्ती चालत येताना दिसली. त्याच्याकडे तिने मदत मागितली व झालेला प्रकार सांगितला. या वेळी त्या व्यक्तीने नजीकच्या रिक्षावाल्याला भेटण्यास सांगितले आणि ती व्यक्ती निघून गेली. त्यानंतर तिने रिक्षावाल्याला भेटून झालेला प्रकार सांगितला. तेव्हा रिक्षावाल्यानेही नजीकच्या अपरांत हॉस्पिटलमध्ये तिला जाण्यास सांगितले. आता या प्रकरणी त्या दोन व्यक्तीची पोलिसांना मदत अपेक्षित असल्याने पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
या प्रकरणी अटक केलेल्या नराधमाचा स्वभाव काहीसा विकृत असल्याची माहिती पुढे आली आहे. कधी कधी हा तरुण दोन, तीन दिवस घराबाहेर असतो. तसेच प्रचंड गुटखा खातो. पीडित तरुणीने माहिती देताना त्याने गुटखा खाल्ला होता, असे पोलिसांना सांगितले होते. तपास करताना पोलिसांनाही तो नेहमी गुटखा खात असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे त्याची ही सवय आता त्याच्याच अंगलट आली आहे. तो जन्मतः लवेलचा रहिवासी असून, मराठीही बोलतो. तो चांगल्याप्रकारे मराठी बोलत असल्याचेही पोलिसांना तरुणीने सांगितले हाेते़ त्यामुळे तपास करताना पाेलिसांना या सर्व माहितीचा उपयाेग झाला़
----------------------
सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे गंभीर गुन्हे उघड
येथील मध्यवर्ती बस स्थानकाच्या परिसरात जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यामुळे बस स्थानकातील अनेक चोऱ्या उघड झाल्या आहेत. मात्र, त्याच जोडीला गंभीर गुन्हेही उघड होत आहेत. याआधी नगर परिषद प्रशासकीय अधिकारी रामदास सावंत खून प्रकरणातील आरोपी पकडण्यासाठी उपयोग झाला होता. नगर परिषदेने शहरात अन्य भागातही तत्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी होत आहे.
---------------------
मित्राचे प्रसंगावधान
पीडित तरुणी एसटी बसमधून उतरल्यानंतर चिंचनाक्याच्या दिशेने मोबाइलवर मित्राबरोबर बोलतच चालली होती. तेवढ्यात कुणीतरी तिची मागून मान धरली व तोंडावर हात ठेवून खेचू लागला. त्यामुळे ती जोरात ओरडली. या वेळी फोन सुरू असल्याने तिच्या ओरडण्याचा मित्राला आवाज आला. त्याने तत्काळ तिच्या घरच्यांशी संपर्क साधून काहीतरी घडल्याचे सांगितले. त्यानुसार तिचे नातेवाईक तिच्या कामाच्या दिशेने येत असताना अपरांत हॉस्पिटलनजीक गर्दी दिसली. तेथे ही तरुणी दिसली व झालेला प्रकार ऐकून त्यांनाही धक्का बसला.