देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील आरवली-राजीवली मार्गावर मुरडव बौद्धवाडी वळणावर डंपर आणि दुचाकी यांच्यात धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात योगेश तुकाराम बाटे (२६) जागीच ठार झाला आहे. हा अपघात शनिवारी सकाळी आठच्या सुमारास झाला. या अपघातात दुचाकीस्वाराच्या डोक्यावरून डंपरचे मागील चाक गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.
याबाबतची फिर्याद मुरडव गावचे पोलीसपाटील राजेंद्र मेणे यांनी दिली. सकाळी मुरडव, बाटेवाडीत राहणारा योगेश तुकाराम बाटे हा तरुण आरवलीहून मुरडवकडे आपल्या दुचाकीने (एमएच ०४ डीएच १९८३) जरत होता. मुरडव येथील छोट्याशा वळणावर समोरून येणाऱ्या डंपर (एमएच ०४ सीयू ९६६३) आणि दुचाकीची धडक झाली. दुचाकी डंपरच्या उजव्या बाजूला धडकली. यावेळी योगेश डंपरच्या मागील चाकाखाली आला आणि डंपरचे चाक योगेशच्या डोक्यावरून गेले.
अपघाताची माहिती कळताच जिल्हा परिषद सदस्य शंकर भुवड, शिवसेना विभागप्रमुख मनू शिंदे, आंबव पोलीस तपासणी नाक्यावरील पोलीस गणेश बिक्कड, ग्रामस्थ संकेत भुवड, सुनील गंगारकर, तुकाराम मेणे, दिनेश परकर, मुकेश चव्हाण, धर्मा कोंडवीलकर घटनास्थळी दाखल झाले. योगेशचा मृतदेह विच्छेदनासाठी माखजन प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला. डॉ. प्रदीप शिंदे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पोलिसांनी डंपरचालक राकेश लक्ष्मण कांबळे याच्यावर ३०४(अ) ३३७, ३३८, २७९ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी घटनास्थळी भेट दिली. अपघाताचा तपास माखजनचे हेडकॉन्स्टेबल प्रशांत शिंदे, तेजस्विनी गायकवाड करीत आहेत.