चिपळूण (जि. रत्नागिरी) : ‘सेक्स्टॉर्शन’ करणाऱ्या राजस्थान येथील टोळीने सोशल मीडियातून झालेल्या ओळखीनंतर अश्लील व्हिडीओ कॉलद्वारे ब्लॅकमेल करत, धमकी देत चिपळुणातील एका १९ वर्षीय युवकाकडे पैशाची वारंवार मागणी केली. या प्रकारामुळे या युवकाने ९ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली.या प्रकरणी राजस्थान येथील १८ वर्षीय तरुणासह अन्य तीन अनोळखी व्यक्तींवर आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि खंडणी प्रकरणी चिपळुणातील अलोरे-शिरगाव पोलिस स्थानकात मंगळवारी (दि. २९ ऑगस्ट) गुन्हा दाखल करण्यात आला.राजस्थानमधील बिकानेर येथील १८ वर्षीय युवकाने चिपळुणातील १९ वर्षीय युवकाशी सोशल मीडियाद्वारे ओळख केली. तसेच त्याच्यासोबत अश्लील व्हिडीओद्वारे संपर्क केला. त्यानंतर त्याचे ‘स्क्रिनशॉट’ तसेच व्हिडीओ रेकॉर्ड करून त्याद्वारे या युवकाला ‘ब्लॅकमेक’ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हे फोटो व व्हिडीओ युट्युबवर अपलोड करण्याची तसेच सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी दिली. याशिवाय गुगल कंपनीकडून बोलत असल्याचे भासवून पोलिस विभागाकडे तक्रार केल्याची भीतीही दाखवली. तसेच ११,५०० रुपयांची खंडणी मागितली. चिपळुणातील युवकाने ही रक्कम ऑनलाइन पाठवली. तरीही ते फोटो व व्हिडीओ युट्युबवर तसेच सोशल मीडियावर अपलोड करण्याची वारंवार धमकी देत हाेते. या त्रासाला कंटाळून या युवकाने ९ ऑगस्ट रोजी आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
चिपळुणातील युवक ‘सेक्स्टॉर्शन’चा बळी, राजस्थानमधील टोळी; तिघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 11:56 AM