रत्नागिरी : जे ४० गद्दार शिवसेनेचे, उद्धव ठाकरेंचे, महाराष्ट्राचे होऊ शकले नाहीत ते जनतेचे काय होणार? या गद्दारांना मातीत गाडा असे आवाहन युवासेना प्रमुख अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरीतील शिवसंवाद यात्रेत केले. शिवसंवाद यात्रेनिमित्त रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आले होते.
ते पुढे म्हणाले की, गद्दारांची वृत्ती महाराष्ट्राला विकासापासून मागे खेचत आहे. त्यांचे शिवसेना फोडण्याचेही प्रयत्न सुरू आहे. ज्यावेळी शिवसेना फुटेल तेव्हा महाराष्ट्राचे पाच तुकडे होतील. सध्या ठाकरे परिवाराला एकटे पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा गंभीर आरोप करीत त्यांनी उपस्थित शिवसैनिक, जनतेला तुम्ही आमच्याबरोबर आहात तर तुम्ही हात उंचावून प्रेम आणि आशीर्वाद द्या, अशी भावनिक साद घातली.
स्थानिक आमदारांनी गद्दारी केली ती योग्य की अयोग्य? महाराष्ट्रात जे घाणेरडे राजकारण चालले आहे ते जनतेला पटणारे आहे का, हे मी येथील जनतेला विचारायला आलो आहे. मात्र, या ४० गद्दारांचे आम्हाला गद्दार म्हणून नका तर विश्वासघातकी म्हणा, असे निरोप येऊ लागले आहेत. आज तेच ४० आमदार स्वत:ला खोके आणि महाराष्ट्राला धोके, असे काम करत असून त्यांनी आजपर्यंतच्या अडीच महिन्यांच्या कालावधीत एक तरी काम राज्याच्या हिताचे केले आहे का, ते दाखवून द्यावे असे आव्हान त्यांनी दिले.
वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प सुमारे दीड लाख कोटीची गुंतवणूक आणि एक लाख युवकांना रोजगार देणारा प्रकल्प गुजरात येथे नेण्यात आला. याच प्रकल्पासाठी त्यावेळचे उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि आपण जून महिन्यापर्यंत पाठपुरावा करत होतो. मात्र, आताच्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे हा प्रकल्प केंद्र सरकारने गुजरातला पळवला. त्यामुळे एक लाख युवकांचा रोजगारही हिरावला, असा आरोपही त्यांनी केला.
यावेळी शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव, माजी खासदार अनंत गिते, आमदार राजन साळवी, जिल्हाध्यक्ष विलास चाळके, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव, उदय बने, प्रमोद शेरे, तालुकाप्रमुख बंड्या साळवी व अन्य नेते उपस्थित होते.