रहिम दलाल, रत्नागिरी : जिल्ह्यात मैलकुलींची कमतरता असल्याने त्याचा परिणाम रस्तेकामांवर होत आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाला सुमारे २ हजार २९३ मैलकुलींची आवश्यकता असून, तशा मागणीचा शासनाकडे गेले वर्षभर पडून आहे. मैलकुली म्हणजेच रस्ता कामगारांची जिल्हा परिषदेला फार मोठी चणचण भासत असल्याने त्याचा मोठा परिणाम रस्त्याच्या कामांवर होत आहे. रस्त्याच्या पृष्ठभागावर खडी येऊन तसेच खड्डे पडून सर्रासपणे अपघात होत असतात. त्यामध्ये काहीजणांना जीवही गमवावा लागतो. शिवाय अनेकजण जखमी होऊन कायमचे जायबंदी होण्याच्या घटनाही घडत असतात. मैलकुली हा जिल्हा परिषदेचे महत्त्वाचे अंग असून, रस्त्याच्या हद्दीतील उपलब्ध मुरुम आणि त्याने खणून काढलेली माती खडीच्या पृष्ठभागावर टाकणे, रस्त्यांच्या बाजूची गटारे व पाणी वाहून जाण्याकरिता खोदलेले चर स्वच्छ ठेवणे व त्यांची योग्य प्रकारे देखभाल करणे, मोऱ्या तसेच लहान व मोठे पूल यांच्या बांधकामात आलेली झाडे झुडपे काढून टाकणे व पाणलोटच्या जागेवरील अडथळा दूर करणे, रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांकडे वेळीच लक्ष पुरविणे, रस्त्याच्या जवळपास उपलब्ध असलेली माती, मुरुम वापरुन रस्त्यांच्या बाजूपट्ट्या भरणे, रस्त्याच्या कडेला असलेले साहित्य, झाडे झुडपे, किलोमीटरचे दगड, सूचना फलक इत्यादींवर लक्ष ठेवून त्यांची देखभाल करणे, धोकादायक व उखडलेली झाडे पाडण्याचे काम करणे व ती उचलून बाजूला टाकणे, झाडांची छाटणी करणे व झाडांच्या फांद्या कापणे आदी कामे हे जिल्हा परिषदेचे मैलकुली करीत असतात. जिल्हा परिषदेच्या रत्नागिरी व चिपळूण या दोन्ही बांधकाम विभागाकडे सुमारे ५० मैलकुली आहेत. ही मैलकुलींची संख्या अगदी किरकोळ असून, जिल्ह्यासाठी २२९३ मैलकुलींची जिल्हा परिषद बांधकाम विभागाला आवश्यक आहे. चौथ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष जे. पी. डांगे यांच्याकडेही मैलकुलींची जिल्हा परिषदेला किती आवश्यकता आहे, याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र तो अजूनही शासनदरबारी पडून असल्याने कामे ठप्प झाली आहेत.भरतीच बंद!मैलकुलींची भरती गेल्या काही वर्षांपासून बंद करण्यात आली असल्याने जिल्हा परिषदेला रस्ते काम व अन्य कामांबाबत मोठी अडचण निर्माण होते. त्यासाठी २२९३ मैलकुलींच्या मागणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. ही भरती बंद असल्याने शासनाकडे अजूनही तो प्रस्ताव पडून आहे. आता ही भरती कधी होणार? असा प्रश्न केला जात असून त्यानंतरच ही कामे मार्गी लागतील.
जिल्हा परिषदेला हवेत २२९३ मैलकुली
By admin | Published: September 13, 2014 11:39 PM