रत्नागिरी : गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ५९० कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली असून रत्नागिरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड याही कोरोनाबाधित झाल्या आहेत. एकाच दिवसात १६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ३९,०५१ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. १३०६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधित होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. शुक्रवारी जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून आलेल्या अहवालानुसार, ५९० जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. यात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड यांचाही समावेश आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव दोन दिवसांपूर्वी पाॅझिटिव्ह आल्याने जिल्हा परिषदेतील पदाधिकारी आणि अधिकारी यांची कोरोना चाचणी करण्याचे आरोग्य विभागाने सुचविले हाेते. त्यानुसार, डाॅ. जाखड यांनी कक्ष अधिकारी आणि आपली स्वॅब चाचणी केली. त्या चाचणीत डाॅ. इंदुराणी जाखड यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.
शुक्रवारी ३२९ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. चाचण्यांची संख्या वाढविण्यात आल्याने शुक्रवारी झालेल्या चाचण्यांमध्ये तब्बल २७३८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ३३,४२० जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ४३२५ जण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.
शुक्रवारी १६ जणांचा मृत्यू झाला. त्यात रत्नागिरीतील १२, चिपळूणमधील आणि संगमेश्वर तालुक्यातील प्रत्येकी दोन रूग्णांचा समावेश आहे.
सध्या जिल्ह्यात रुग्णसंख्या तसेच उपचारादरम्यान मृत्यू होणाऱ्यांची संख्या नियंत्रणात येणे अवघड झाल्याने आरोग्य यंत्रणेवर अधिक ताण येत आहे. कोरोनाबाधित होणाऱ्यांची टक्केवारी १७.८३ टक्के इतकी असून मृत्यूची टक्केवारी ३.३४ टक्के इतकी आहे. त्याचबरोबर आता बरे होणाऱ्यांच्या टक्केवारीतही वाढ होत असून सध्या ती ८५.५८ टक्के इतकी आहे.