दापाेली : तालुक्यातील हर्णै बंदर हे रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छिमारी व्यवसायासाठी प्रसिध्द व मच्छिमारांसाठी जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचे मच्छिमारी बंदर म्हणून ओळखले जाते. मात्र, हर्णै बंदर अजूनही काही समस्यांच्या गर्तेत अडकलेल्या अवस्थेत आहे. त्या अनुषंगाने अनधिकृतपणे एल. ई. डी. बल्बच्या सहाय्याने मच्छिमारी बंदीबाबत राज्य शासनाकडे नवीन कायदा करण्याबाबत पाठपुरावा करत आहे. त्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेचेही भक्कम सहकार्य मिळावे, अशी मागणी हर्णै परिसरातील ग्रामस्थांनी केली.
दापोली तालुक्यातील हर्णै येथे नागरी सुविधा योजना व हर्णे ग्रामपंचायत फंडातून नव्याने बांधलेल्या मच्छीमार्केटचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड उपस्थित हाेत्या.
या कार्यक्रमात गेल्यावर्षीच्या निसर्ग चक्रीवादळाने दापोली मतदार संघात जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींचे झालेले नुकसान सांगण्यात आले. निसर्ग चक्रीवादळात नुकसानग्रस्त शाळांच्या इमारती अद्यापही उभ्या राहिलेल्या नसून, आता राज्य शासनाने आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, दापोली विधानसभा मतदार संघातील बहुतांशी शाळांच्या इमारती अद्यापही बांधकामाच्या तसेच दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत, त्यामुळे वर्ग भरवायचे कुठे, हा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
तसेच अनेक गावांतील जमीनदोस्त झालेले स्मशान स्टॅण्ड आणि शेडची कामे अजूनही प्रतीक्षा यादीतच प्रलंबित आहेत. स्मशानभूमी स्टॅण्ड आणि शेडच्या कमतरतेमुळे त्या-त्या गावातील ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी हर्णैच्या सरपंच ऐश्वर्या धाडवे, उपसरपंच महेश पवार, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण समिती सभापती भगवान घाडगे, जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती रेश्मा झगडे, गटविकास अधिकारी आर. एम. दिघे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रदीप सुर्वे, शिवसेना तालुका संघटक उन्मेष राजे, जिल्हा परिषद सदस्य अनंत करबेले, पंचायत समिती सदस्य रऊफ हजवाने, वृषाली सुर्वे, हर्णै पंचक्रोशीचे अध्यक्ष अंकुश बंगाल, हर्णै तंटामुक्तीचे अध्यक्ष अविनाश निवाते, मच्छीमार संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळकृष्ण पावसे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.