लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या इमारतीवर सौर पॅनेल बसविण्यात आले आहेत. त्यामुळे परिषद भवन लवकरच वीजनिर्मितीमध्ये स्वयंपूर्ण होणार आहे. या सौर पॅनेलची मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली.
जिल्हा परिषदेसह ५ पंचायत समितींच्या इमारती सौरऊर्जेवर चालणार आहेत. त्यासाठी ९० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी परिषद भवनाच्या सौर पॅनेलवर ५९ लाख रुपये खर्च येणार आहे. या पॅनेलमधून तासाला १३० युनिट विजेची निर्मिती होणार आहे. तर परिषद भवनासाठी ११,५०० युनिटचा वापर होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे प्रत्येक महिन्याचे सुमारे दीड लाख रुपये वीज बिलाचे वाचणार आहेत. सौरऊर्जेचा प्रकल्प अपारंपरिक ऊर्जा विकास कार्यक्रमांतर्गत राबविण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाकडून प्रयत्न करण्यात आले होते.
मुख्यकार्यकारी अधिकारी, खातेप्रमुख आणि पदाधिकारी यांच्या केबीनमध्ये ए.सी., पंखे, दिवे आदिंचा वापर करण्यात येतो. त्याचे वार्षिक वीज बिल सुमारे १५ लाख रुपयांपेक्षा जास्त येते. सौरऊर्जेचा वापर केल्यावर हे बिल शून्यावर येणार आहे. त्याचा आर्थिक फायदा जिल्हा परिषदेला होणार आहे. या सौरऊर्जेचे पॅनेलचे काम पूर्ण झाले आहे. परिषद भवनाच्या इमारतीवर उभारण्यात आलेल्या या सौर पॅनेलची पाहणी मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी केली. त्यावेळी कृषी विभागाचे अधिकारी व कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.