खेड : रत्नागिरी येथून मजुरांना घेऊन नेपाळ हद्दीवर निघालेल्या खासगी आरामबसला खेड नजीकच्या भोस्ते घाटात अपघात झाला. एका अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस पलटी झाली. रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही.रत्नागिरी जिल्ह्यात विविध ठिकाणी काम करणा-या नेपाळी मजुरांनी आपल्या गावी जाण्यासाठी एक खासगी बस भाड्याने ठरवली होती. प्रत्येक मजुराकडून ७ हजार रुपये भाडे घेऊन खासगी बस या मजुरांना नेपाळच्या हद्दीवर नेऊन सोडणार होती. रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमाराला रत्नागिरी येथून सुटलेल्या या बसमध्ये ४० प्रवासी आणि काही लहान मुले होती.आपल्या कुटुंबासह गावाकडे जाण्यासाठी निघालेली ही बस रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्याच्या हद्दीतील भोस्ते घाट उतरत होती. एका अवघड वळणार चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस रस्त्याच्या दुभाजकावर आदळून पलटी झाली. बसमधून प्रवास करणा-या प्रवाशांचे केवळ दैव बलवत्तर म्हणून सर्वजण जीवघेण्या अपघातातून बचावले. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला.