मुंबई- बेडरुम म्हणजे झोपायची खोली. तुमचं विश्रांती घेण्याचं हक्काचं स्थान. दिवसभर काम केल्यानंतर तुम्हाला आराम हवा असतो आणि शांतपणे झोप येणे ही तुमची एकमेव इच्छा असते. पण बेडरुम व्यवस्थित नसेल तर तसं होईलच असे नाही. उलट अस्ताव्यस्त बेडरुममुळे चिडचिड होण्याची, त्रास होण्याचीच शक्यता जास्त असते. त्यामुळे बेडरुमची योग्यप्रकारे स्वच्छता व अंतर्गत रचना करणं महत्त्वाचं आहे.
1) अडगळीची खोली करु नका- बेडरुममध्ये तुम्ही वेगवेगळं साहित्य, सामान साठवून ठेवणार असाल तर ती खोली कधीही प्रसन्न वाटणार नाही. नको असलेले बॅगा, पिशव्या, खोके साठवून ठेवलीत तर त्या खोलीत थांबावसं तुम्हाला वाटणार नाही. या अनावश्यक वस्तूंमुळे बेडरुम स्वच्छ करणंही कठिण होतं. बेडरुममधील अनावश्यक वस्तू दुसरीकडे नेल्या तर बेडरुम झोपण्यासाठी योग्य होईल.
2) कपडे जमिनीवर फेकू नका- बेडरुममध्ये अस्ताव्यस्त कपडे फेकण्यासारखं वाईट काहीच नाही. वापरलेले कपडे एका बास्केटमध्ये किंवा एका जागी गोळा केलेले असावेत. धुतलेले कपडे एका बाजूला व्यवस्थित घड्या करुन ठेवावेत. त्याचप्रमाणे इस्त्री झालेले कपडेही वेगळे कपाटात ठेवण्यात यावेत.
नवं घर घेणार की जुनं? घर घेताना या मुद्द्यांचा जरुर विचार करा...
3) चप्पल बूट लांबच ठेवा- बेडरुमपासून चपला आणि बूट शक्यतो दूर ठेवा. बेडरुममध्ये झोपताना मोजे वापरत असाल तर ते वेळोवेळी धुतलेले आणि कोरडे असावेत. अन्यथा त्यांच्या फायद्यापेक्षा तोटाच जास्त संभवतो.
4)पुस्तके शक्यतो नकोत- पुस्तके, कागद, रद्दी तसेच फाईल्सवर धूळ मोठ्या प्रमाणात साठते, त्यामुळे पुस्तकांचे कपाट बेडरुममध्ये असू नये. तसेच दम्याचा त्रास असणाऱ्या लोकांना या धुळीचा त्रास होऊ शकतो. अगदीच पुस्तके ठेवायची झाली तर ती सतत स्वच्छ ठेवली पाहिजेत.
तुमच्या घरातल्या पुस्तकांच्या लायब्ररीची कशी काळजी घ्याल?
5)बेडरुममध्ये जेवू नका- बेडरुम हे खाण्या-पिण्याचं ठिकाण नाही. या खोलीमध्ये खाण्याची सवय मोडली पाहिजे. बिछान्यावर खाणाऱ्या लोकांनी ही सवय सोडण्यासाठी आवर्जून प्रयत्न केले पाहिजेत. तुमचं जेवण, खाणं, चहा यामधील कोणताही पदार्थ, पेय बिछान्यावर सांडू शकतो, त्यामुळे नव्या प्रश्नांना आमंत्रण दिले जाऊ शकते. तसेच असं खाणं आरोग्यासाठीही हानिकारक असते. जेवण हे योग्य स्वच्छ जागीच झालं केलं पाहिजे.
6) काही वस्तू वेळच्यावेळी फेका- बेडरुममध्ये काही वस्तू अनावश्यक असतात. उपयोग नसलेल्या, मोडलेल्या वस्तू वेळोवेळी फेकल्या पाहिजेत. अनावश्यक कपडे आणि वापरात नसलेले कपडेही वेळल्यावेळी खोलीबाहेर काढले पाहिजेत.
ग्रीन होम म्हणजे काय? घर बांधायचं असेल तर याचा विचार करा