मुंबई- आपल्या घराच्या आसपास झाडं असावीत, फुलझाडं असावीत असं आपल्याला नेहमी वाटत असतं. जर घरातच ही झाडांवर डवरलेली टपोरी, रसरसलेली फुले दरवळू लागली, तर घरात एक प्रकारचे चैतन्य निर्माण होते. तुम्हाला जर बागकामाची आवड असेल आणि त्यासाठी जागा उपलब्ध नसेल, तर आपल्याला आपल्या आवडीला मुरड घालावी लागते. विशेषत: शहरांमधील लोकांची फारच पंचाईत होते. म्हणून आपली आवड जोपासण्यासाठी तुम्ही घरातच ग्रीन होमची संकल्पना साकारू शकता. अगदी किचनपासून ते दिवाणखान्यापर्यंत आपण आपल्या आवडीनुसार रोपांच्या कुंड्या लावू शकता. जर तुमच्याकडे अगोदरच काही कुंड्या असतील, तर त्यांची रचनात्मक मांडणी तुमच्या घराला वेगळा लूक देईल. दिवाणखान्यात शक्यतो फुलझाडे किंवा शोभेच्या रोपांचा वापर करा.
घरातील गार्डनिंग तुम्हाला तुमच्या घराच्या इंटिरियरमध्येही उपयोगी ठरू शकेल. त्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
- तुम्ही ज्या ठिकाणी रोप लावणार आहात, त्या जागेनुसार रोपाची निवड करा. अशी अनेक रोपे आहेत, जी सावलीत जास्त चांगल्याप्रकारे वाढतात.
- रोप अशा जागी लावा, जिथे भरपूर प्रकाश असेल.
- रोपांना भरपूर नैसर्गिक हवा व सूर्यप्रकाश मिळण्यासाठी ती बाल्कनीत लावली जातात. मात्र, इनडोअर रोपे किंवा ग्रीन होमची संकल्पना साकारताना रोपाला नैसर्गिक हवा मिळेल, याची काळजी घ्या.
- घरात हिरवळ साकारताना कुंड्यांच्या निवडीचाही विचार करा. आजकाल बाजारात खूप छान प्रकारे डेकोरेट केलेल्या कुंड्या मिळतात. जागेनुसार त्यांची निवड करा.
- तुम्हाला जर रोपांबद्दल ज्ञान नसेल, तर जवळच्या नर्सरीत जाऊन रोपांबद्दल माहिती घ्या, जेणेकरून रोपांची निवड करताना तुम्हाला कठीण जाणार नाही.
- आठवड्यातून एकदा रोपांची स्वच्छता जरूर करा. योग्य निगा राखल्यास रोपांची वाढ चांगल्याप्रकारे होते.
- रोपांवर किटक व डासांची पैदास होणार नाही याची काळजी घ्या.
- रोपांची वेळोवेळी छाटणी करा व त्यांना छान आकार द्या.
- तुम्ही जर रोपांच्या कुंड्या खाली लावू शकत नसाल, तर हँगिंग कुंड्या आणा. या टांगलेल्या कुंड्या खूप छान दिसतात. मात्र, यात पसरलेली वेलींची रोपे जास्त खुलून दिसतात.
- सध्या सिरॅमिक कुंड्यांची खूपच चलती आहे. या कुंड्या तुमच्या घराला एक आगळे वेगळे सौंदर्य बहाल करतात. गेरूआ रंगाच्या कुंड्याही खूप आकर्षक दिसतात.
हे झाले इनडोअर गार्डनिंग, पण जर तुमच्याकडे बागकामासाठी भरपूर जागा असेल, तर मात्र तुम्ही तुमची गार्डनिंगची हौस मनसोक्त भागवू शकता.
- खिडक्या व दरवाजासमोर फुलझाडे लावा. जेणेकरून प्रत्येकवेळी तुमची त्यावर नजर पडून तुम्हाला प्रसन्न वाटेल.
- गेटच्या दुतर्फा छान शोभेची झाडे लावा, म्हणजे येणाºया प्रत्येक पाहुण्यावर तुमच्याबाबत सकारात्मक इंप्रशेन पडेल.
- तुम्ही तुमच्या बागेत हिरव्या भाज्या, मिरची, कडीपत्ता अशा प्रकारची रोज आवश्यकता भासणारी रोपेही लावू शकतात, जी वेळोवेळी तुम्हाला किचनमध्ये हेल्प करतील.
- काही औषधी वनस्पतींनाही जागा रिझर्व ठेवा. त्यामध्ये अॅलोविरा, तुळस, ओव्याचे रोप अशा प्रकारची रोपे तुम्हाला आजारपणात कधीही उपयुक्त ठरतील.
तुमच्या ग्रीन होमची काळजी कशी घ्याल?
- कुंड्या तुटल्या-फुटल्या किंवा एखादे रोप वाळून गेले, तर लगेचच ते बदला. वाळलेले रोप काढून, त्याजागी दुसरे रोप लावा. अन्यथा बागेच्या सौंदर्याला बाधा निर्माण होईल.
- थंडीचे दिवस आहेत, म्हणून रोपांना पाणी देणे टाळू नका. नियमितपणे रोपांना पाणी द्या.
अशा प्रकारे इनडोअर आणि आउट डोअर बागेची कलात्मक रचना करून, ग्रीन होमची संकल्पना साकारू शकता आणि प्रत्येक ऋतूचा आनंद हिरवळीच्या सान्निध्यात लुटू शकता.