स्नेहल जोशी
शेगडी ठेवलेल्या मुख्य ओट्याची रुंदी शेगडी आणि त्यापुढे काही भांडी मावतील अशी असावी तर बाजूच्या ओट्याची रुंदी बेसिनच्या आकारमानावर अवलंबून आहे; पण इथेही भांडी घासायला वाकावं लागत असेल तर रुंदी जास्त झाली हे नक्की.
खोलीची उंची १० फूट आणि दरवाजाची ७ फूट ही कशी आणि कोणी ठरवली असेल? मुख्य दरवाजा ४ फूट तर आतल्या खोलीचा ३ फूट आणि बाथरूमचा मात्र जेमतेम २.५ फूट आणि स्वयंपाकघराला तर दार नाहीच, हे असं का? जेवणाचं टेबल ३१ इंच उंच आणि अभ्यासाचं २९ इंच या दोन इंचात काय मोठं घडत असावं? घरातली प्रत्येक जागा/वस्तू, त्याचा होणारा उपयोग, संपर्कात येणाऱ्या व्यक्ती आणि त्यांच्या पद्धती, सवयी या सगळ्यांची सांगड घालायला हवी.
सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे, घराचं मुख्य द्वार ४ फूट, तर आत खोल्यांची दारं ३ फूट रुंद असतात आणि उंचीला मात्र सगळीच ७ फूट असतात. वास्तविक यातून येणारी माणसं तीच असतात. पण मुख्य दारातून आपण अवजड वस्तूसुद्धा आत आणतो. त्यामुळे त्याच्या रुंदीमध्ये माणूस आणि हातातलं सामान एका वेळेला आत यायला हवं. त्याच प्रमाणे, सगळ्यात उंच माणूस न वाकता आत आला तर कोणीही त्यातून आत येऊ शकेल. तेव्हा भारतीय प्रमाण गृहीत धरता साधारण ६ फूट उंच पुरुष आणि त्याच्या डोक्यावर एखादी टोपी/फेटा आणि वर थोडी मोकळी जागा लक्षात घेतली तर ७ फूट दरवाजा हा लागणारच. आता याच तार्किक दृष्टीने स्वयंपाकघराकडे वळूया.
सकाळची धामधुमीची वेळ. पोळ्या करता करता एकीकडे भाजीही ढवळली जाते. तयार झालेल्या पोह्यांची गरम कढई ओट्यावरून डायनिंग टेबलवर ठेवायची आहे. थोडी भांडी घासायची आहेत, पाण्याच्या बाटल्या भरायच्या आहेत आणि डबेही भरायचेत. सकाळच्या वेळात इथे इतकी ये-जा असते की या खोलीला दार असलं तर त्याची अडचणच होते. दार ठेवणं अपरिहार्य असेल तर ते दोनही बाजूला उघडेल असं ठेवावं. असं ठेवल्याने पदार्थांची भांडी आत-बाहेर नेता-आणताना दार ढकलून उघडण्याची सोय होते. त्याचबरोबर दाराच्या बिजागरीला स्प्रिंग बसवावी म्हणजे दार आपोआप बंद होतं. त्यानंतर ज्याच्या जिवावर या सगळ्या क्रिया चालतात तो ओटा.
कसं ठरवणार हा ओटा किती मोठा घ्यायचा ते?
1) सगळ्यात पहिल्यांदा ओट्याची उंची. इथे सर्वमान्य, आदर्श माप विचारात न घेता स्वयंपाकघरात प्रामुख्यानं काम करणाऱ्याची सोय लक्षात घ्यावी.
2) पोळी लाटताना पाठीत वाकावं लागणार नाही किंवा खांदेही उचलले जाणार नाही अशी उंची योग्य. तसंच ओट्यावर शेगडी ठेवून त्यावरच्या कढईतला पदार्थ नीट दिसेल या हिशोबानं उंची ठरवावी. त्याचप्रमाणे ओट्याच्या रुंदीचा विचार करताना शेगडीच्या पुढे पोळपाट, परात ठेवायला जागा मिळून लाटताना होणाऱ्या हाताच्या हालचालींनाही पुरेशी जागा मिळायला हवी. हा झाला व्याप्तीचा विचार. पण ओट्याशी काम करणाऱ्या व्यक्तीची पोहोचपण लक्षात घ्यायला हवी. ओट्याची संपूर्ण रुंदी व्यक्तीच्या हाताच्या टप्प्यात असायला हवी.
3) आपल्या पोहोचेच्या कक्षा असतात. हाताची कोपरं शरीराला जुळवलेली राहून ज्या अंतरावर काम करता येतं ती प्राथमिक कक्षा अर्थात प्रायमरी सर्कल खांद्यांपासून हात मोकळे ठेवून ज्या अंतरापर्यंत पोहोचता येतं ती माध्यमिक कक्षा सेकंडरी सर्कल आणि कमरेत वाकून जिथवर पोहोचता येतं ती अर्थातच तिसरी कक्षा म्हणजेच टेरेटिअरी सर्कल. जी बाब शारीरिक पोहोचेच्या टप्प्यांची तीच दृष्टीचीही. स्थिर डोळ्यांना जिथवर पोहोचता येतं ती दृष्टीची प्राथमिक कक्षा. डोळ्यांची हालचाल करून माध्यमिक कक्षेपर्यंत दृष्टीचा आवाका वाढतो, तर तिसऱ्या कक्षेत दृष्टीनी पोहोचायला मात्र मान हलवावी लागते. वारंवार वापरल्या जाणाऱ्या, सर्वाधिक लागणाऱ्या वस्तू या प्राथमिक कक्षेत असल्या की श्रम कमी होतात आणि वेळही वाचतो. इथे स्वयंपाकघराचाच विचार केला तर चमचे, डाव, मिसळणाचा डबा, चहा, साखर, मीठ इत्यादी गोष्टी अगदी सतत लागतात. तेव्हा या गोष्टींची सोय हे दृष्टी आणि हाताच्या या दोन्हीच्या प्राथमिक कक्षेत असणं गरजेचं आहे. त्या तुलनेत क्वचित लागणाऱ्या वस्तू तिसऱ्या कक्षेतल्या कपाटांमध्ये ठेवल्या तर त्यांची अडचण होत नाही. त्यातसुद्धा काम करणारी व्यक्ती डावरी असेल तर त्याचाही विचार करायला हवा.
वरकरणी क्षुल्लक भासणारे हे सूक्ष्मभेद वस्तू आणि वास्तूरचनेला खूप मोलाचे ठरतात. यामध्ये व्यक्तीच्या फक्त सोयीचाच नाही तर स्वास्थ्याचाही खोल विचार दडलेला आहे. स्वयंपाकघराप्रमाणे इतर खोल्यांच्या रचनेकडे, कार्याभ्यासाच्या चष्म्यातून पाहाता येतं.
(लेखिका आर्किटेक्ट आणि प्रॉडक्ट डिझायनर आहेत.)